जळगाव (प्रतिनिधी) बनावट झेंडू बाम, आयोडेक्स, हार्पीक, सर्फ एक्सल, डेटॉल साबणासह डव शॅम्पू या कंपनीचा बनावट उत्पादने विक्री होत असल्याचे उघड झाले आहे. या बनावट साहित्याच्या विक्रीचा बुधवारी एमआयडीसी पोलिसांनी पर्दाफाश केला. या प्रकरणी जयप्रकाश नारायणदास दारा (रा. नेहरुनगर) व आकाश राजकुमार बालानी (रा. गायत्रीनगर) या दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून ७ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेमुळे नागरिक चिंतेत पडले आहेत. कारण दररोज वापरत असलेल्या त्यांच्या घरातील ब्रांडेड कंपनीची उत्पादनांची खरी की बनावट ?, असा प्रश्न आता जळगावकरांना पडला आहे.
दोघं ताब्यात, ७ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त !
जळगाव शहरातील जयप्रकाश दारा व आकाश बालानी हे दोघ विविध कंपन्यांचे उत्पादनांसारखे दुसरे बनावट उत्पादन तयार करुन त्याची विक्री करीत असल्याची माहिती नेत्रीका कन्सल्टींग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे फिस्ट ऑफिसर सिद्धेश सुभाष शिर्के (रा. जोगेश्वरी पूर्व मुंबई) यांना मिळाली होती. त्यानुसार कारवाई करण्याबाबत पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांची भेट घेतली होती. पोलीस अधीक्षकांनी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना कारवाईसाठी मदत करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार नेत्रीका कन्सल्टींग इंडिया प्रा. लि. कंपनीच्या सहकाऱ्यांसह एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पथकाने नेहरु नगरातून जयप्रकाश दारा तर गायत्री नगरातून आकाश बालानी यांना ताब्यात घेतले.
या पथकाची कारवाई !
ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोहेकॉ रामकृष्ण पाटील, गणेश शिरसाळे, सचिन मुंढे, पोना योगेश बारी, सचिन पाटील, पोका विशाल कोळी, राहुल रगडे, छगन तायडे, महिला पोलीस कर्मचारी राजश्री बाविस्कर यांच्या पथकाने केली.
असा आहे जप्त मुद्देमाल !
दोघ संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची चौकशी केली. यामध्ये जयप्रकाश दारा यांच्या मालवाहू वाहनातून ३ लाख ३८ हजार रुपयांचे एनो सिक्सर, झंडू बाम, आयोडेक्स, हार्पीक प्लस, डेटॉल साबन, डव शॅम्पू व सर्फ एक्सलचे कंपनीचे तर आकाश बालानीच्या चारचाकी वाहनातून १४ हजारांचे असे एकूण ७ लाख ५ हजारांचे बनावट उत्पादन मिळून आले.. हा संपुर्ण माल एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने जप्त केला असून दोघ संशयितांविरुद्ध फसवणुकीसह कॉपी राईट अॅक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, दररोज वापरत असलेल्या घरातील ब्रांडेड कंपनीची उत्पादने खरी की बनावट ?, याची खात्री करूनच ग्राहकांनी खरेदी करण्याची गरज आहे.