अंबड जि. जालना (वृत्तसंस्था) सासरा मुलीला नांदायला पाठवत नाही, चार लेकरांची आई असलेली पत्नी प्रियकरासोबत पळून गेली म्हणून संतप्त झालेल्या जावयाने सासऱ्याचा बंदुकीने गोळ्या झाडून खून केला. ही घटना अंबड शहरातील शंकरनगर येथे घडली. पंडित भानुदास काळे असे मृताचे नाव आहे.
पंडित काळे यांना एक मुलगा व दोन मुली आहेत. त्यांच्या दुसऱ्या मुलीचा विवाह किशोर शिवदास पवार (रा. आडूळ, ह.मु. पाचोड) याच्यासोबत झाला होता त्यांना दोन मुली व दोन मुलगे झाले. नंतर दोघांची वादावादी सुरू झाली. त्यातूनच काही दिवसांपूर्वी किशोरची पत्नी पाचोड येथील एका मुलासोबत पळून गेली. किशोर हा नेहमी सासरा पंडित काळे यांना शिवीगाळ करत होता. बुधवारी सकाळी संशयित किशोर पवार, नितीन जाधव व एक अनोळखी व्यक्ती दुचाकीवरून आले. तिघांनी पंडित काळे यांना शिवीगाळ करून मारहाण केली. नंतर किशोर याने पंडित काळे यांच्या गळ्यावर व पाठीवर दोन गोळ्या झाडल्या. यानंतर तिन्ही संशयित घटनास्थळावरून फरार झाले. या प्रकरणी तीन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तिन्ही आरोपी फरार झाले आहेत.