जळगाव (प्रतिनिधी) मागील वर्षी कोरोना विषाणुच्या संसर्गामुळे अनेकांना नातेवाईक व आप्तेष्ट गमवावे लागलेत. बहुतांश जणांचे संसार अर्ध्यावर मोडले. या आघातातून काही कुटुंबे सावरू लागली आहेत. नव्याने संसाराची उभारणी होत आहे. अशा फेरजुळणीत एक आदर्शवत गंधर्व विवाहविधी वरणगाव (ता. भुसावळ) येथे पार पडला. कोरोना संसर्गामुळे विवाहित कन्येला गमावणाऱ्या पालकांनी जावई व दोन नातींचे कुटुंब पुन्हा फुलविण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
जळगाव येथील सुप्रसिद्ध विधीज्ञ व भोरगांव लेवा पंचायतीचे कुलसचीव ॲड.संजय राणे यांचे थोरले बंधू मिलिंद मनोहर राणे (रा. अहमदाबाद) यांची कन्या कोमल हिचा विवाह अहमदाबाद येथील सुजीत दिलीप महाजन यांच्याशी झाला होता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संसर्गामुळे कोमल हिचे दि. ३ मे २०२१ ला निधन झाले. स्व. कोमल व सुजीत यांना उर्वि व चार्वी अशा दोन मुली आहेत. त्या दोघी लहान आहेत. स्व. कोमल ही सातवीत असताना पासून तिचे संपुर्ण शिक्षण हे आजोबा एम. डी. राणे, आजी स्व. पुष्पलता व काका ॲड. संजय व किरण राणे यांच्याकडे जळगावला झाले. तिचे लग्नही त्यांच्या पुढाकाराने सुजीत यांच्याशी जुळले होते. त्यांचा संसार सुखाचा सुरू होता. मात्र कोरोनाच्या आपत्तीने संसाराला दृष्ट लागली.
स्व. कोमलच्या अकाली निधानानंतर जावाई आणि नातींचे कुटुंब अधुरे झाले. सुजीत यांचा संसार पुन्हा फुलविण्यासाठी ॲड. संजय राणे यांनी कुटुंबात पुढाकार घेतला. ॲड. संजय राणे हे भोर पंचायतीचे कुलसचिव म्हणून कार्यरत आहेत. ते पंचायतीच्या सर्व कार्यात सहभागी होतात. अनेकांचे दुरावलेले वा घटस्फोटीत संसार ते पुन्हा जुळवतात. ॲड. संजय राणे यांनी सुजीत यांचा दुसरा विवाह करण्याचे सूचविले. जेष्ठ बंधु मिलिंद व उद्योजक किरण राणे व सुजीत यांचे वडील दिलीप महाजन व आजोबा एम. डी. राणे यांनीही हा विचार उचलून धरला. सुजीत हे सुद्धा तयार झाले.
ॲड. संजय राणे व कुटुंबियांनी सुजीत यांना मुलगा मानून त्यांचा दुसरा विवाह जुळवायला प्रयत्न सुरू केले. परिचितांमधून नशिराबाद (ता. जळगाव) येथील विनोद रोटे यांची कन्या लिनाचे स्थळ समोर आले. लिना घटस्फोटीता आहे. ती सुद्धा दुसऱ्या विवाहास तयार होती. अखेर राणे-महाजन कुटुंबियांच्या संमतीने रितसर विवाह जुळणी झाली. सुजीत व लिनाचा गंधर्व विवाह गुरूवार, दि. ९ रोजी पार पडला. या विवाहाकडे आदर्शवत आणि अनुकरणीय पाऊल म्हणून पाहता येते. जुन्या परंपरा मोडून कुटुंब पुन्हा फुलविण्याचा राणे, महाजन व रोटे कुटुंबाचा हा प्रयत्न समाज परिवर्तनाचा नवा माईलस्टोन रोवणारा असून समाजासमोर आदर्श घडविणारा आहे.