जळगाव (प्रतिनिधी) शिवसेनेने सभागृहात बहुमताचा आकडा पार केला आहे. त्यामुळे अत्यंत चुरशीच्या झालेल्या महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या जयश्री महाजनच विजयी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यानिमित्ताने भाजपसह माजी मंत्री गिरीश महाजन यांना जोरदार झटका बसला आहे.
या निवडणुकीत महापौरपदासाठी जयश्री महाजन यांनी बहुमतापेक्षा जास्त मते मिळवली आहे. त्यांना आतापर्यंत ४५ मते मिळाली आहेत. महापौरपदासाठी ऑनलाईन पद्धतीने निवडणूक झाली. महापौर व उपमहापौर पदासाठीच्या निवडणुकीआधीच भाजपमध्ये पडलेल्या फुटीमुळे निवडणूक चुरशीची झाली होती. शिवसेनेने आपल्या सर्व नगरसेवकांना व्हीप बजावून जयश्री महाजन व कुलभूषण पाटील यांना मतदान करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तर सर्व भाजपने देखील नगरसेवकांना व्हीप बजावून पक्षाकडून देण्यात येणाऱ्या उमेदवाराला मतदान करण्याच्या सूचना दिल्या होत्या. जळगाव महापालिकेच्या निवडणुकीत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि विनायक राऊत यांनी नेतृत्व केले होते.