छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) सोन्याच्या दागिन्यांना पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने दोन अनोळखी भामट्यांनी एका महिलेची फसवणूक करून ९७ हजार ७०० रुपयांचे दागिने लंपास केल्याची घटना शुक्रवारी सकाळी वैजापूर शहरातील मारवाडी गल्ली भागात घडली.
वैजापूर शहरातील मारवाडी गल्ली भागातील लता जैन (वय ५२ वर्षे) यांच्या घरासमोर शुक्रवारी सकाळी ११:३०च्या सुमारास दोन अनोळखी व्यक्ती आले. त्यांनी लता जैन यांना आम्ही सोने, चांदी, तांबे, पितळ भांड्यांना पॉलिश करतो असे सांगितले. त्यानंतर लता जैन यांचा विश्वास संपादन करून त्यांना घरातून तांब्याचे भांडे आणण्यास सांगितले.
लता जैन यांनी तांब्याचे भांडे दिल्याने त्यांनी ते पॉलिश करून दिले. त्यानंतर त्यांनी चांदीचा तांब्या पॉलिश करण्यासाठी दिला. त्यानंतर त्या भामट्यांनी लता जैन यांच्या गळ्यातील सोन्याची चेन, दोन बांगड्या व अंगठीदेखील पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने काढून घेतली. त्यानंतर घरातून बंद झाकणाचा डबा आणायला सांगितला व त्यात दोन चमचे हळद, सर्व दागिने व लिक्विड टाकण्यास सांगितले. त्यानंतर हा डबा गॅस शेगडीवर ठेवायला सांगितला. यानंतर आम्ही शेजारच्या घरी जाऊन येतो, असे सांगून दोघं भामटे तेथून पसार झालेत. थोड्या वेळाने डब्यात दागिने नसल्याचे आढळल्याने फसवणूक झाल्याचे लता जैन यांच्या लक्षात आले. लता जैन यांनी तात्काळ पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. या प्रकरणी दोन अनोळखी भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.