जळगाव (प्रतिनिधी) नातेवाईकाचे निधन झाल्याने त्यांना भेटण्यासाठी गेलेल्या महिलेच्या पर्समधील ५ लाख २५ हजार रुपयांचे दागिणे चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
या संदर्भात सरला मदनलाल शेटीया (वय ६९,अहमदनगर) ह्या २२ जुलै २०२२ रोजी जळगाव शहरातील भगीरथ कॉलनीत राहत असलेल्या त्यांच्या नातेवाईकाचे निधन झाल्यामुळे भेटण्यासाठी आल्या होत्या. सरला शेटीया यांच्याकडे प्रवासात पर्स होती. या पर्समध्ये ५ लाख २५ हजारांचे दागिणे होते. सरला शेटीया यांनी भगीरथ कॉलनीत पोहचल्यावर आपली पर्स तपासली. त्यावेळी त्यांना पर्समध्ये ठेवलेले ५ लाख २५ हजारांचे दागिणे गायब झाल्याचे आढळून आले. सर्वत्र शोध घेतला, मात्र दागिण्यांबाबत कुठलीही माहिती मिळाली नाही. शेवटी अज्ञात व्यक्तीने आपले दागिणे चोरुन नेल्याची खात्री झाल्यावर तब्बल तीन महिन्यानंतर सरला शेटीया यांनी जिल्हापेठ पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरुन बुधवारी जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक किशोर पवार हे करीत आहेत.