वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन आणि उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्या शपथविधीपूर्वी राजधानी वॉशिंग्टनला लष्करी छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचा २० जानेवारी रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत. बायडन अमेरिकेचे ४६वे राष्ट्राध्यक्ष आहेत. त्यांच्यासोबतच उपराष्ट्रपती म्हणून कमला हॅरिस शपथ घेणार आहेत. राष्ट्रपतींच्या सुरक्षेसाठी जवळपास ३५ हजार सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष शपथविधी समारंभ अत्यंत साधेपणानं साजरा करण्यात येणार आहे. असं सांगितलं जात आहे की, या शपथविधी समारंभासाठी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मात्र अनुपस्थित राहणार आहेत. स्थानिक पोलिस व अन्य सुरक्षा एजन्सींच्या कर्मचाऱ्यांसह राष्ट्रीय सुरक्षा दलाचे ३५ हजार जवान वॉशिंग्टनमध्ये तैनात करण्यात आले आहेत. कॅपिटॉल हिल परिसर, पेनसिल्व्हेनियाचा बराचसा भाग आणि व्हाइट हाउसभोवती आठ फूट उंचीचे बॅरिकेड्स लावून हा सर्व परिसर सामान्य नागरिकांसाठी प्रतिबंधित करण्यात आला आहे. सहा जानेवारीला डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी कॅपिटॉल हिलवर हिंसक हल्ला केला होता. अमेरिकेच्या इतिहासातील या अत्यंत खेदजनक घटनेत पाच नागरिकांचा मृत्यू झाला होता. अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ नये व सत्तेचे हस्तांतरण शांततेत पार पडावे, यासाठी सुरक्षा दलांकडून सर्वतोपरी खबरदारी घेतली जात आहे. संपूर्ण शहरात हाय अॅलर्ट जारी करण्यात आला असून, वॉशिंग्टन डीसीला अभेद्य किल्ल्याचे स्वरूप देण्यात आले आहे.
‘कोव्हिड-१९’ च्या प्रादुर्भावामुळे या वेळचा शपथविधी सोहळा तुलनेने मर्यादित स्वरूपात व साधेपणाने होणार आहे. सामान्य नागरिकांना या वेळी कमी प्रमाणात प्रवेश असणार आहे. अमेरिकी वेळेनुसार, शपथविधी सकाळी १० वाजता सुरु होणार आहेत. दरम्यान, वॉशिंग्टनची वेळ भारतीय वेळेहून १० तास ३० मिनिटं पुढे आहे. शपख घेतल्यानंतर जो बायडन देशाला संबोधित करणार आहेत. असं मानलं जात आहे की, या संबोधना दरम्यान बायडन पुढील ४ वर्षांसाठी राष्ट्राप्रतीचं त्यांचं व्हिजन सांगू शकतात. मिळालेल्या माहितीनुसार, जो बायडन कोरोनाविरोधातील लढा, अमेरिकेची अर्थव्यवस्था आणखी मजबूत करण्यासोबतच राष्ट्राची एकता अबाधित ठेवण्यासाठी आपल्या योजनांवर प्रकाश टाकतील.
बायडन राष्ट्राध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाच्या वतीनं घेण्यात आलेले काही विवादीत निर्णय पलटू शकतात. मिळालेल्या माहितीनुसार, बायडन यांनी आपल्या कार्यकाळापूर्वी १० दिवसांत घेतलेल्या निर्णयांची यादी तयार केली आहे. या यादीत मुस्लिम देशांवर घालण्यात आलेलेल प्रतिबंध रद्द करण्याच्या निर्णयाचाही समावेश आहे. शपथविधी समारंभानंतर ते इतरही अनेक महत्त्वाच्या निर्णयांवर आपली स्वाक्षरी करु शकतात.
आंदोलकांच्या छोट्या-छोट्या समूहांनी रविवारी अमेरिकेच्या राज्यांतील प्रांतिक विधिमंडळांसमोर निदर्शने केली. यातील काही जणांकडे शस्त्रेसुद्धा होती. मात्र, मोठ्या प्रमाणात तैनात असलेले राष्ट्रीय सुरक्षा दलाचे जवान आणि पोलिसांनी कॅपिटॉल हिलवरील हल्ल्यासारख्या घटनेची पुनरावृत्ती होऊ दिली नाही. सुरक्षा दलांनी आंदोलकांना पांगवल्यानंतर संध्याकाळनंतर सर्वच ठिकाणी शांतता होती.