वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) इलेक्टोरल कॉलेज मतदानामध्ये अमेरिेकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डेमोक्रॅटीक पक्षाचे जो बायडन यांचा विजय झाला आहे. तर, विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पराभवावर शिक्कामोर्तब झाले आहे.
या विजयानंतर बायडन यांनी म्हटले की, देशामध्ये लोकशाहीचा विजय झाला आहे. देशात सिद्धांत दाबण्याचे, त्यांना चिरडण्याचे प्रयत्न झाले. मात्र, अमेरिकन लोकशाहीचे सिद्धांत झुकले नाही. लोकशाही मूल्य अमेरिकन नागरिकांमध्ये जिवंत आहेत. सत्तेचा दुरुपयोग करणारे आणि निवडणूक प्रक्रियेला प्रभावित करणारे नेते अमेरिकन नागरिकांना येत्या काही वर्षात पाहावे लागणार नसल्याचे बायडन यांनी ट्रम्प यांचे नाव न घेता म्हटले. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पराभवाचा सामना करावा लागला. काही राज्यांमध्ये अतिशय चुरशीची लढत झाली. मात्र, ट्रम्प यांनी आपला पराभव मान्य केला नाही. निवडणूक मतमोजणीत आघाडीवर असताना आपणच विजयी झालो आहोत, त्यामुळे मतमोजणी थांबवावी अशी मागणी ट्रम्प यांनी केली होती. त्याशिवाय पोस्टल मतांमध्ये गैरप्रकार झाला असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला होता. काही राज्यांमध्ये त्यांनी न्यायलयातही धाव घेतली. मात्र, त्या ठिकाणीही फारस काही हाती लागले नाही. अमेरिकेच्या संविधानाच्या तरतुदींनुसार, राज्यांचे प्रतिनिधी असणाऱ्या ५३८ इलेक्टोरल कॉलेजनी सोमवारी मतदान केले. यामध्ये जो बायडन यांना ३०६ आणि डोनाल्ड ट्रम्प यांना २३२ मते पडली. बायडन यांच्या विजयासह कमला हॅरीस या अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्रपती असणार आहेत. अमेरिेका राष्ट्राध्यक्षपदाच्या निकालानंतर जवळपास सव्वा महिने सुरू असलेला वाद आता संपुष्टात येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.