एरंडोल (प्रतिनिधी) शहरातील तरूणाचा विहीरीत पडल्याने बुडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. दरम्यान तरुणाचे २५ एप्रिल रोजी लग्न होणार होते. लग्नाला पाच दिवस बाकी असताना झालेल्या या घटनेबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
यासंदर्भात अधिक असे की, एरंडोल येथील महात्मा फुले पुतळा परिसरात राहणारा भावेश संजय महाजन (वय-२५) तरूण हा बुधवारी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास आपले काका ज्ञानेश्वर महाजन यांचेकडून नाष्टा करुन येतो म्हणुन त्यांच्या मुलाची दुचाकी घेवून गेला. बराच वेळ झाला तरी भावेश घरी परत आला नाही म्हणुन ज्ञानेश्वर महाजन यांनी भावेशच्या घरी तपास केला. परंतु भावेश घरी परत आला नव्हता. थोड्यावेळाने त्यांचे पुतणे राकेश व मनोज यांनी ज्ञानेश्वर महाजन यांना मोबाईलवर आपल्या शेताजवळील सुनिल भैया पाटील यांच्या शेतातील विहिरीत भावेश विहिरीत पडलेला असून तरंगत असल्याचे सांगितले.
तत्काळ ज्ञानेश्वर महाजन व त्यांचे नातेवाईक गजानन माळी हे खाजगी वाहनाने घटनास्थळी पोहचले व भावेशला विहिरीतून काढून एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. दरम्यान भावेश याचे २५ एप्रिल रोजी लग्न होणार होते. लग्नाला पाच दिवस बाकी असताना झालेल्या या घटनेबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. भावेशच्या पश्चात आई, वडील, लहान भाऊ असा परिवार आहे. ज्ञानेश्वर महाजन यांच्या खबरीवरून एरंडोल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास एरंडोल पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करीत आहे.