नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या कालीचरण महाराजांना (Kalicharan On Mahatma Gandhi) अखेर अटक करण्यात आली आहे. मध्य प्रदेशात ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे. रायपूर पोलिसांनी (Raipur Police) खजुराहो येथून कालीचरणला अटक केली आहे.
छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे आयोजित धर्मसंसद २०२१चा कार्यक्रमा दरम्यान, शेवटच्या दिवशी संत कालीचरण यांनी महात्मा गांधींबद्दल अपशब्द वापरत देशाच्या फाळणीसाठी बापूंनाही जबाबदार धरले. कालीचरण यांचे वादग्रस्त विधान व्हायरल झाल्यानंतर कालीचरण यांच्यावर रायपूरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
रायपूर शहरातील रावण भटा मैदानावर दोन दिवसीय धर्मसंसद कार्यक्रमाच्या समारोपावेळी कालीचरण म्हणाले, इस्लामचे ध्येय राजकारणाच्या माध्यमातून राष्ट्रावर कब्जा करणं आहे. १९४७ मध्ये आमच्या डोळ्यांसमोर त्यांनी कब्जा केला होता, असंही ते म्हणाले. आधी इराण, इराक आणि अफगाणिस्तान ताब्यात घेतलं. राजकारणाच्या जोरावर त्यांनी बांगलादेश आणि पाकिस्तान काबीज केलं. मोहनदास करमचंद गांधी यांची हत्या केल्याबद्दल मी नथुराम गोडसेला सलाम करतो. असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी यावेळी केले होते.
कालीचरण यांच्या या वादग्रस्त विधानावर काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांनी त्यांच्यावर टीका केली आहे. महात्मा गांधींबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी कालीचरण यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. काँग्रेस नेते आणि रायपूर महानगरपालिकेचे अध्यक्ष प्रमोद दुबे यांच्या तक्रारीनंतर कालीचरण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.