छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) वाळूज महानगर सावत्र पित्याने अत्याचार केल्याने १३ वर्षीय मुलीने बाळाला जन्म दिल्याची संतापजनक घटना वाळूज परिसरात घडली. नराधम पित्यास पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
पूनम (नाव बदलले) या घटस्फोटित महिलेचा तीन वर्षांपूर्वी ३५ वर्षीय व्यक्तीशी पुनर्विवाह झाला होता. पहिल्या पतीपासून पिंकी (नाव बदलले) ही मुलगी असून दुसऱ्या पतीपासून दोन अपत्ये आहेत. पिंकी आठवीत शिकते. नातेवाइकाने ३० जुलै रोजी वाळूज पोलिसांशी संपर्क साधून पिंकीला झटके येत असल्याने तिला रुग्णालयात नेत असल्याचे कळवत तिला गंगापूर ग्रामीण रुग्णालयात नेले.
प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी तिला घाटीत नेण्याचा सल्ला दिला डॉक्टरांनी तपासणी केली असता तिच्या पोटात ६ महिन्यांचा गर्भ असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी तिची प्रसूती केली. बाळावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. पिंकीची प्रकृती गंभीर असून ती बोलण्याच्या स्थितीत नसल्याचे कळते. परंतू या घटनेमुळे समाजमन सुन्न झाले आहे.