नवी दिल्ली (वृत्तसंस्था) अर्णव गोस्वामी यांची याचिका तातडीने सुनावणीला घेऊन त्यांना लगोलग जामीन मंजुर करण्यात आल्या प्रकरणी स्टॅंडअप कॉमेडियन कुमार कामरा यांनी सर्वोच्च न्यायालयावर टीका करणारा ट्विट संदेश प्रसारीत केला होता.
या प्रकरणात त्यांच्या विरोधात कोर्टाचा अवमान केल्याच्या कारणावरून याचिका दाखल करण्यात आली आहे. पण कामरा यांनी या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाची माफी मागण्यास साफ नकार दिला आहे. आपली कोर्टाच्या विरोधीतील शेरेबाजीही मागे घेण्यास त्यांनी नकार दिला आहे.
ऍटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी आठ जणांना कामरा यांच्या विरोधात अवमानना याचिका दाखल करण्यास अनुमती दिली आहे. कुणाल कामरा यांनी वेणुगोपाल यांना व कोर्टाला उद्देशून लिहीलेल्या पत्रात आपण कदापिही माफी मागणार नाही आणि वक्तव्य मागे घेणार नाही असे स्पष्ट केले आहे. कुणाल कामरा यांनी इंडिगो कंपनीच्या मुंबई ते लखनौ विमानात यापूर्वी अर्णव गोस्वामी यांना धक्काबुक्कीही केली होती.
सर्वोच्च न्यायालयाने अर्णव गोस्वामी यांना लिबरटीच्या हक्काच्या आधारे तातडीने जामीन मंजुर केल्याच्या प्रकरणात त्यांनी थेट सर्वोच्च न्यायालयावरच बेधडक टीका केली होती. अशा प्रकारच्या पक्षपाती निर्णयांच्या विरोधात कोणीतरी आवाज उठवणे गरजेचेच आहे असेही त्यांनी म्हटले आहे. न्यायायलयातील महात्मा गांधी यांचा फोटो काढून त्या ऐवजी के. के. वेणुगोपाल यांचा फोटो तेथे लावा आणि पंडित नेहरूंचा फोटो काढून तेथे महेश जेठमलानींचा फोटो लावा अशी जाहीर सुचनाही कामरा यांनी केली आहे.
नोटबंदी, जम्मू काश्मीरला देण्यात आलेला विषेश दर्जा, इलेक्टोरल बॉंडची वैधता इत्यादी महत्वाच्या विषयांवरील असंख्य याचिका प्रदीर्घ काळापासून प्रलंबीत आहेत.त्याकडे दुर्लक्ष करून अर्णव गोस्वामीला सुप्रिम कोर्टाने इतके सर्वोच्च प्राधान्य कसे दिले असा त्यांचा आक्षेप आहे.