नवी दिल्ली (वृत्तसंस्था) काँग्रेसचे माजी नेते कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी 16 मे रोजी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर सपातर्फे राज्यसभेची उमेदवारी मिळणार आहे. या संदर्भात सिब्बल यांनी माहिती दिली आहे. संसदेत स्वतंत्र आवाज असणे आवश्यक असल्याचे सिब्बल म्हणाले.
काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी सपा प्रमुख अखिलेश यादव यांची लखनौमध्ये भेट घेतली. कपिल सिब्बल यांना राज्यसभेवर पाठवण्यात आझम खान यांचा मोठा हात आहे. सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात आझम यांची केस लढवली होती. आझम यांना जामीन मिळवून देण्यात कपिल सिब्बल यांचे महत्त्वाचे योगदान आहे. सपाकडे राज्यसभेच्या आणखी दोन जागा शिल्लक आहेत, त्यावर अजुनही उमेदवार जाहीर केलेले नाहीत. या जागांसाठी डिंपल यादव आणि जावेद अली खान यांची नावे आघाडीवर आहेत.
सिब्बल हे काँग्रेसच्या सर्वात ज्येष्ठ नेत्यांपैकी एक होते. त्यांनी पक्षाच्या नेतृत्वाची आणि संघटनेची संपूर्ण फेरबदल करण्याची मागणी केली होती. काही दिवसापूर्वी त्यांनी गांधींच्या नेतृत्वावर टीका केली होती. गांधी घराण्याने काँग्रेस पक्षाचे नेतृत्व पद सोडावे अशी त्यांनी मागणी केली होती.