मुंबई (वृत्तसंस्था) नव्या कृषी कायद्याविरोधात पंजाब हरियाणातील शेतकरी जवळपास महिनाभरापासून आंदोलन करत आहेत. त्यामुळे शेतकरी विरुद्ध सरकार असा थेट संघर्ष सध्या सुरू आहे. शेतकऱ्यांनी आंदोलनाची पुरेशी दखल घेत नसल्याने विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करत आहेत. आता या मुद्यावरून शिवसेना गुरुवाणी चा अर्थ सांगत मोदींवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.
‘प्राण जाए पर वचन न जाए, सर कटा सकते है लेकिन सर झुका सकते नहीं’, असा बाणा औरंगजेबाला दाखवणारे गुरू तेगबहादूर हे छत्रपती शिवाजी, छत्रपती संभाजी महाराजांप्रमाणेच धर्मवीर ठरले. त्यामुळे शिखांच्या शेतकरी आंदोलनाकडे फिरवून मोदी गुरुद्वारा रकीबगंज येथे पोहोचले, तरी दिल्लीच्या सीमेवरील पंजाबचा शेतकरी विचलित झाला नाही. त्याचा संघर्ष, त्याचा लढा सुरूच राहिला. पंतप्रधान मोदी यांनी गुरू तेगबहादूर यांच्याकडून प्रेरणा घेतली. आनंद आहे. दिल्लीच्या सीमेवरील हजारो शीख लढवय्येसुद्धा त्याच प्रेरणेतून लढत आहेत. त्यामुळे लढाईचा अंत काय? असा परखड सवाल शिवसेनेनं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारला आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून शेतकरी आंदोलनावरून पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. ‘मोदी हे अचानक रकीबगंज गुरुद्वारात पोहोचले. त्याच वेळी तेथे जी ‘गुरुवाणी’ सुरू होती, त्याचा थोडक्यात सारांश असा तुम्ही सेवा करता. ईश्वराची भक्ती करता. करीतही असाल, पण तुमचे विचार बदलले नाहीत तर त्या सेवेचा, भक्तीचा काय उपयोग? तुम्ही धर्मग्रंथांची अनेक पारायणे केली, परंतु त्यातील उपदेश, शिकवणूक तुम्ही समजून घेतली नाही, त्याचा अंगीकार मानवतेच्या कल्याणासाठी केलाच नाही तर धर्मग्रंथांच्या त्या पारायणांचा काय उपयोग? अशा वेळी जेव्हा तुमची ‘वेळ’ येईल, तुमच्या कर्मांचा ‘हिशोब’ होईल त्या वेळी तुम्ही काय करणार? कुठे तोंड लपविणार? काळापासून कोणीही स्वतःचा बचाव करू शकलेले नाही आणि करू शकणार नाही, हे तुम्ही नीट लक्षात ठेवा, असं सांगत सेनेनं मोदींना टोला लगावला.