जळगाव (प्रतिनिधी) माजी मंत्री एकनाथ खडसे यांना गेल्या दोन महिन्यात तीनवेळा कोरोनाची लागण झाली आहे. हा कोणत्या प्रकारचा कोरोना आहे, याची चौकशी करावी, असे मी म्हणणार नाही. पण, या कोरोनावर शास्त्रज्ञांनी संशोधन केले पाहिजे. तसेच नायनाट करून तो पुन्हा होणार नाही, अशी मागणी करत भाजप नेते गिरीश महाजन यांनी खडसेंना झालेल्या कोरोनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आज जळगावात झालेल्या लोकार्पण सोहळ्याच्या वेळी ते बोलत होते.
केंद्र सरकारच्या अमृत पाणीपुरवठा योजनेंतर्गत भूमिगत साठवण टाकी आणि पंपिंग हाऊसचा लोकार्पण सोहळा शनिवारी (दि. २० फेब्रुवारी) दुपारी जळगावात पार पडला. या सोहळ्याला भाजप नेते गिरीश महाजन उपस्थित होते. या सोहळ्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. गिरीश महाजन म्हणाले, मला एकनाथ खडसे यांची काळजी आहे. त्यांना २० दिवसांपूर्वी कोरोना झाला होता. त्यांना आता परत काल-परवा कोरोना झाला. म्हणजेच महिनाभरात त्यांना दुसऱ्यांदा कोरोना झाला. आधीही त्यांना कोरोनाची लागण झालेली होती. त्यामुळे याची अधिक काळजी घेण्याची गरज आहे. हा कोणता आजार आहे. जो महिन्याभरात तीनवेळा होतो. कोरोना एकदा झाला की तो लवकर होत नाही, असे सांगितले जाते. म्हणूनच आम्हाला काळजी आहे. यावर संशोधन व्हायला हवे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबत नुकत्याच झालेल्या बैठकीत मी आमच्या जिल्ह्याची अधिक काळजी घेण्याची मागणी केली होती. हा कोरोनाचा नेमका कोणता प्रकार आहे, यासाठी शास्त्रज्ञांना सांगून संशोधन करायला सांगा. त्याचा नायनाट करून तो पुन्हा होणार नाही याची काळजी घ्या, असे मी सांगितल्याचे गिरीश महाजन म्हणाले.