मुंबई (प्रतिनिधी) ईडीच्या कचाट्यात सापडलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. प्राथमिकदृष्ट्या पाहिलं तर खडसेंनी पुणे जमीन खरेदीत महत्वाची भूमिका बजावली असून गैरव्यवहार केल्याचं दिसतंय, असं स्पष्ट निरीक्षण ईडी कोर्टाने नोंदवलं आहे. त्यामुळे खडसेंचा पाय आणखी खोलात जाण्याची चिन्हं आहेत.
भोसरी येथील वादग्रस्त भूखंड खरेदी प्रकरणी एकनाथराव खडसे यांच्यासह त्यांच्या सौभाग्यवती आणि जावई अडचणीत आले आहेत. या प्रकरणी त्यांची चौकशी झाली असून जावई गिरीश दयाराम चौधरी यांना अटक करण्यात आली आहे. तर सौ. मंदाताई खडसे यांना चौकशीसाठी समन्स पाठविण्यात आले आहेत. या पार्श्वभूमिवर कोर्टात गिरीश चौधरी यांच्या जामीनावर झालेल्या सुनावणीत ईडीने दावा करत या भूखंडाच्या खरेदीत गैरव्यवहार झाल्याचे नमूद केले आहे. यााबत एका इंग्रजी वृत्तसंस्थेने या वर्तमानपत्राने आपल्या वृत्तात सविस्तर विवरण दिले आहे.
या सुनावणीत ईडीने जोरदार युक्तीवाद करून खडसे यांच्या विरोधातील पुरावे सादर केले. यावर न्यायालयाने खडसे यांना या प्रकरणाची काहीही माहिती नव्हती, या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. खडसे हे त्या वेळी महसूल मंत्री होते. याच जमीनीच्या संदर्भात त्यांनी १२ एप्रिल २०१६ रोजी अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. आणि यानंतर २८ एप्रिल रोजी मंदा खडसे आणि गिरीश चौधरी यांनी संयुक्तरित्या ही जमीन खरेदी केल्यासे सर्व पुरावे आहेत. यामुळे खडसे यांचा हात सहभाग असल्याचे कोर्टाने म्हटले. तर याच जमीनीच्या खरेदीसाठी सहा शेल कंपन्यांनी मंदा खडसे आणि गिरीश चौधरी यांच्या खात्यांमध्ये पैसे वळते केल्याचेही पुरावे आढळून आले आहेत. या सर्व घडामोडी तेव्हा महसूलमंत्री असणाऱ्या खडसे यांच्या प्रभावानेच पार पडल्याचे निरिक्षण कोर्टाने नोंदविले आहे. यामुळे ते देखील यात सहभागी असल्याचे दिसून येत आहे. परिणामी ते पीएमएलए या कायद्याच्या अंतर्गत सहभागी असल्याचे दिसून येत असल्याचे कोर्टाने नमूद केले आहे.
सर्वात लक्षणीय बाब म्हणजे, भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणात अनेक सबळ पुरावे असल्याचे कोर्टाने म्हटले आहे. खडसे हे एका सत्ताधारी पक्षाचे वजनदार नेते असल्यामुळे ते पुराव्यांमध्ये छेडछाड तर साक्षीदारांवर दबाव टाकण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील पुरावे आणि गांभीर्य पाहता खडसे हे यातील प्रमुख सूत्रधार असण्याची शक्यता कोर्टाने आपल्या निरिक्षणात व्यक्त केली आहे.
योग्य वेळ आली की सीडी लावणार
पुणे येथील भोसरी एमआयडीसी भूखंड खरेदी गैरव्यवहार प्रकरणी ईडीने खडसे यांची लोणावळा आणि जळगाव येथील ५ कोटींहून अधिकची मालमत्ता जप्त केली. यानंतर खडसे यांनी प्रतिक्रिया देत आता योग्य वेळ आली की सीडी लावणार असल्याचा इशारा दिला आहे. ईडी लावली तर सीडी लावेन असे मी म्हणालो होतो, हे खरे आहे. गेल्या पाच सहा महिन्यांपासून ती सीडी पोलिसांकडे दिली आहे. पोलीस त्याची चौकशी करत आहेत. चौकशी अहवाल आल्यानंतर लवकरच हा अहवाल जाहीर करणार आहे. ईडी चौकशीवर परिणाम होईल, असे आपण बोलणार नाही. परंतु खान्देशातील नेतृत्व संपविण्याचे षड्यंत्र रचले जात आहे, असा आरोप खडसे यांनी केला आहे. दरम्यान, एकनाथ खडसे यांच्या ५ कोटी ७३ लाखांच्या मालमत्तेवर टाच आणताना ईडीने खडसे यांचा लोणावळा येथील बंगला, जळगाव येथील तीन जमिनी आणि तीन फ्लॅट जप्त केले आहेत.
काय आहे भोसरी जमीन घोटाळा?
फडणवीस सरकारमध्ये एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना त्यांनी पुण्यातील भोसरी येथे ३.१ एकर एमआयडीसी प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप २०१६ मध्ये झाला होता. ३१ कोटी रुपयांची किंमत असलेल्या या भूखंडाची निव्वळ ३.७ कोटी रुपयांना विक्री झाल्याचा दावा केला गेला होता. रेडी रेकनर दरापेक्षा खूपच कमी बाजारमूल्य दाखवून जमिनीची खरेदी झाल्याचा आरोप आहे.
हा भूखंड अब्बास उकानी यांच्या मालकीचा होता. त्यांच्याकडून एमआयडीसीने १९७१ मध्ये तो अधिग्रहण केला होता, परंतु उकानी यांना नुकसान भरपाई देण्याचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे. खडसे यांनी १२ एप्रिल, २०१६ रोजी बैठक बोलावली आणि अधिकाऱ्यांना जमीन उकानींना परत द्यावी की त्यांना जास्त नुकसानभरपाई द्यावी याविषयी त्वरित निर्णय घेण्याचे निर्देश दिल्याचा दावा केला जातो. पंधरवड्यातच उकानी यांनी खडसे यांच्या नातलगांना (पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी) भूखंड विक्री केल्याचं समोर आलं होतं.