मुंबई (वृत्तसंस्था) एकनाथराव खडसे यांच्या विरोधातला विनयभंगाचा खटला संपलेला नाही. खडसे हे धादांत खोटं बोलत आहेत, असा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. एवढंच नाही तर खडसे हे खुनशी प्रवत्तीचे असून मी भाजपाचे नेते नितीन गडकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्याविरोधातही लढले. पण खडसे यांनी माझा जेवढा छळ केला तेवढा कुणीही केला नाही, असाही आरोप दमानिया यांनी केला आहे. त्या मुंबईत एका पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
मुंबईतील पत्रकार परिषदेत दमानिया पुढे म्हणाल्या की, खडसे यांच्या विरोधातला विनयभंगाचा खटला संपलेला नाही. या प्रकरणी अजून आरोपपत्रच दाखल झालेले नाही, तर खटला संपला कसा? असाही प्रश्न दमानिया यांनी विचारला आहे. तसेच मी भाजपाचे नेते नितीन गडकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्याविरोधातही लढले. पण एकनाथराव खडसे यांनी माझा जेवढा छळ केला तेवढा कुणीही केला नाही. खडसे यांनी त्यांच्या वाढदिवशी माझ्याबद्दल अश्लील वक्तव्य केले. वाट्टेल ते बोलले, त्यामुळे वाकोला पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात अशा प्रकाराचं वक्तव्य शोभणारं नाही. त्यामुळे एकनाथ खडसेंना धडा शिकवण्यासाठी मी एफआयआर दाखल केला. त्यावर पुढे काहीही झालं नाही याला कारण तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच जबाबदार आहेत. या प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांनी सोयीचं राजकारण केले. तर कोणत्याही पत्रकार परिषदेत माझं नाव घ्याल तर याद राखा मी तुम्हाला सोडणार नाही, असा इशारा देखील दमानिया यांनी खडसेंना दिला आहे. तर दमानिया यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीकास्त्र सोडले. माझ्याबद्दल एकनाथ खडसे जे काही माझ्याबद्दल बोलले ते जर अमृता फडणवीस यांच्याबद्दल बोलले असते तर फडणवीस शांत बसले असते का? फडणवीस तेव्हा मुख्यमंत्री होते, एका मुख्यमंत्र्याला ही भाषा शोभते का? असा सवाल देखील दमानिया यांनी विचारला आहे.