जळगाव (प्रतिनिधी) भाजपचे नाराज नेते एकनाथराव खडसे येत्या शुक्रवारी दुपारी दोन वाजता राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. थोड्याच वेळात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे पत्रकार परिषद घेत आहेत. मुंबईत राष्ट्रवादीकडून खडसेंच्या प्रवेशाची अधिकृत घोषणा होणार असल्याची चर्चा आहे.
याबाबत ‘टीव्ही-९’ ने वृत्त दिले आहे. भाजपचे नाराज नेते एकनाथराव खडसे येत्या शुक्रवारी दुपारी दोन वाजता राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. परंतू त्याआधी ते भाजपचा राजीनामा देऊन सर्व पदे सोडणार आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच खडसे यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर आली होती. परंतू त्यावेळी खडसे यांनी राजीनाम्याचे वृत्त फेटाळून लावले होते. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खडसे यांच्या पक्षप्रवेशाबाबत थोड्याच वेळात अधिकृत घोषणा करणार आहेत. खडसे समर्थक भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे त्यांच्या बंगल्यावर जमा झाले आहेत. तर खडसे यांच्या समर्थकांना गुरुवारी मुंबईत जमण्याच्या सूचना देण्यात आल्याचे वृत्त मंगळवारी समोर आले होते.