जळगाव प्रतिनिधी । शिवसेनेच्या प्रवक्त्यांची यादी नुकतीच जाहिर झाली असून यात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सात प्रमुख प्रवक्यांमध्ये ना.पाटील यांना स्थान देण्यात आले.
ना.गुलाबराव पाटील ह्यांचे परखड वकृत्तव, ३० वर्षांपासूनची पक्षनिष्ठा आणि कृषी क्षेत्रात असलेला अभ्यास याच्या बळावर पाटील यांना पक्षाने हि संधी दिेल्याचे सांगितले जात आहे. शिवसेनेचे प्रवक्तेपद असो वा मंत्रिपद असो हे मुंबईसह कोकणपट्टयातील नेत्यांनाच प्राधान्याने दिले जाते. मात्र यंदा या पदांच्या स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातील नेत्याची वणर्धी लागणे ही बाब गौरवास्पद आहे. यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचे वातावरण पसरले आहे.
शिवसेनेत शाखाप्रमुखांपासून सुरु केलेले कार्य व जनतेला खिळवून ठेवणारी वकृत्तव शैलीच्या बळावरच गुलाबराव पाटील ह्यांनी हा पल्ला गाठला. आमदार, उपनेते, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री व आता मुख्य प्रवक्तेपद हे गुलाबराव पाटील यांच्या शिरपेचात लागलेला तुरा आहे. गुलाबराव पाटील यांचा सर्वसामान्य कार्यकर्ता ते मंत्री पदाचा अविस्मरणीय प्रवास जिल्ह्यातील सामान्य कार्यकर्त्यांच्या दृष्टीने प्रेरणा देणारा ठरणार आहे.
पक्षाची भूमिका प्रभावीपणे मांडणार
आतापर्यंत पक्षाने माझ्यावर जी जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा माझा प्रयत्न राहीला आहे. आता प्रवक्तेपदाची संधी पक्षाने माझ्यावर टाकली आहे. पक्षाची भूमिका प्रभावीपणे मांडण्याचा माझा प्रयत्न राहणार असल्याची प्रतिक्रिया पालकमंत्री गुलाबराव पाटील ह्यांनी दिली.