मुंबई (वृत्तसंस्था) भ्रष्टाचाराचे आरोप करत ठाकरे सरकारला अंगावर घेणारे भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या अडचणीत सापडले आहेत. कारण किरीट सोमय्या यांचे सुपुत्र आणि भाजप नगरसेवक नील सोमय्या यांच्याविरुद्ध खंडणीचा आरोप करण्यात आला असून याप्रकरणी पोलिसांकडून त्यांची चौकशी करण्यात आली आहे. पोलिसांकडून त्यांची चार तास कसून चौकशी करण्यात आली.
भाजप नेते किरीट सोमय्या यांचे पुत्र व नगरसेवक नील सोमय्या हे चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. पोलिसांनी खंडणीच्या एका जुन्या प्रकरणात नील यांचा जबाब नोंदवून घेतल्याची माहिती मिळत आहे. एका जुन्या प्रकरणात नील सोमय्या यांना मुलुंड पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं होतं. नील यांच्यावर खंडणीचा आरोप करण्यात आला आहे. मुलुंड पोलीस ठाण्यात त्यांचा जबाबही नोंदवण्यात आला. तब्बल ४ तास चौकशी झाल्यानंतर नील सोमय्या हे घरी परतले. मात्र आगामी काळातही याच प्रकरणावरून नील सोमय्या यांची चौकशी होऊ शकते. त्यामुळे विविध मुद्द्यांवर राज्य सरकारला धारेवर धरणाऱ्या किरीट सोमय्या यांची राजकीय अडचण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजप नेते किरीट सोमय्या हे घणाघाती आरोपांसाठी ओळखले जातात. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारवर असो की थेट ठाकरे कुटुंबावर सोमय्या यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. मनी लॉन्ड्रिंग, भुखंडावरील ताबा असे आरोप करत किरीट सोमय्या यांनी अनेकदा सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र आता किरीट सोमय्या यांच्या मुलाचीच खंडणीसारख्या गंभीर गुन्ह्यात चौकशी सुरू झाल्याने ते बॅकफूटवर गेल्याचं बोललं जात आहे. नील यांच्यावर बिल्डरकडून खंडणी उकळल्याचा आरोप झाला असला तरी अद्याप याप्रकरणी त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, असेही कळते. त्यामुळे नील यांचा जबाब नोंदवल्यानंतर पोलीस आता कोणती कारवाई करतात, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.