जळगाव (प्रतिनिधी) आज एटीएसनं देशभरातील पीएफआय ( PFI ) या संघटनेच्या कार्यालयावर छापेमारी करून काही जणांना ताब्यात घेतलं आहे. यामध्ये जालन्यातील अब्दुल हादी अब्दुल रौफ (Abdul Hadi Abdul Rauf) याला जळगावमधील एका धार्मिक स्थळातून भल्या पहाटे ताब्यात घेण्यात आलं आहे. (ATS Raid In Jalgaon)
अनेक वर्षापासून पीएफआय संघटनेचं काम
जळगावातून ताब्यात घेतलेला अब्दुल हादी अब्दुल रौफला नेमका आहे तरी कोण?, याबाबत फारशी कुणालाही माहिती नाहीय. अगदी तो धार्मिक स्थळी कसा काय झोपलेला होता?, याबाबत कुणालाही काहीही माहिती नाही. परंतू पहाटे लवकर धार्मिक स्थळ उघडले जाते. त्यामुळे भल्या पहाटे आला असेल असा अंदाज आहे. अब्दुल हादी अब्दुल रौफ हा अनेक वर्षापासून पीएफआय या संघटनेचं काम असल्याची माहिती समोर येत आहे. अब्दुल हादी अब्दुल रौफ हा मूळ जालन्यातील नेर सेवलीतील रहिवासी असून तो संघटनेच्या जालन्यातील सोशल मीडियाचं काम पाहत असल्याचे कळतेय. याबाबतचे वृत्त फोटोसह ई टीव्ही भारतने प्रकाशित केले आहे. (ई टीव्ही भारतच्या बातमीची लिंक)
अब्दुल जळगावात कधी आला?
दहशतवादी विरोधी पथकाच्या अकोला युनीटचे पोलीस उपनिरीक्षक गौरव सराग, हवालदार अनिल देवरनकर, सचिन चव्हाण, योगेश सतरकर, रिजवान आदींचे पथक तीन वाहनाने पहाटे तीन वाजता जळगावात दाखल झाले. स्थानिक पोलिसांची मदत घेऊन पथक पहाटे चार वाजता मेहरुणमधील दत्त नगरातील धार्मिकस्थळावर पोहचले. त्यानंतर तेथे वरच्या मजल्यावर झोपलेल्या तिघांना ताब्यात घेऊन एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यापैकी चौकशी अंती दोघां सोडून देण्यात आले. तर अब्दुल हादी अब्दुल रौफ याला ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, अब्दुल हा जळगावात कधी आला होता. याबाबत काही ठोस माहिती समोर आली नसली तरी तो बुधवारी सायंकाळी जळगावात आल्याची माहिती मिळत आहे. परंतू त्याला कोणी आश्रय दिला?, आश्रय देणाऱ्याचा यात काही सहभाग आहे का? याबाबतची अधिक माहिती पोलीस चौकशीतूनच समोर येणार आहे.
देशभरात एनआयए, ईडीचे छापे सुरू
महाराष्ट्रात टेरर फंडिंगप्रकरणी 20 जणांना अटक करण्यात आली आहे. टेरर फंडिंग प्रकरणी देशभरात एनआयए, ईडीचे छापे सुरू आहेत. दरम्यान, दिल्लीतून एक मोठी बातमी समोर येत आहे. पीएफआयचे अध्यक्ष परवेझसह त्याच्या भावाला येथून अटक करण्यात आली आहे. याशिवाय पीएफआयचे राष्ट्रीय सचिव व्हीपी नजरुद्दीन यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. एनआयएचे पथक त्यांना सोबत घेऊन गेले असल्याचे सांगण्यात आले. एनआयए देशातील 10 राज्यांमध्ये छापे टाकत आहे. यादरम्यान 100 हून अधिक जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
एनआयएची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई
एनआयएने याला आतापर्यंतची सर्वात मोठी तपास कारवाई म्हटले आहे. एनआयएने सांगितले की, दहशतवाद्यांना कथितपणे निधी पुरवणे, त्यांच्यासाठी प्रशिक्षणाची व्यवस्था करणे, प्रतिबंधित संघटनांमध्ये सामील होण्यासाठी लोकांना फसवणे यात गुंतलेल्यांच्या छुप्या ठिकाणांवर छापे टाकले जात आहेत. पहाटेच्या कारवाईत एटीएस महाराष्ट्रने औरंगाबाद, पुणे ,कोहलापूर ,बीड , परभणी, नांदेड, जळगाव, जालना, मालेगाव, नवी मुंबई, ठाणे आणि मुंबई येथे मोठ्या प्रमाणात छापे टाकले. मुंबई, नाशिक, औरंगाबाद आणि नांदेड येथे आयपीसीच्या विविध कलमांतर्गत आणि यूएपीए कलम १३(१) (ब) मध्ये समाजात वैर वाढवणाऱ्या बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी होण्यासाठी आणि कट रचल्याबद्दल चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.