कोल्हापूर (वृत्तसंस्था) गेल्या काही दिवसात पावसाचा जोर वाढल्यानं महाराष्ट्रात आता अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात अद्यापही पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे आता कोल्हापूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पंचगंगा नदीने देखील धोक्याची पातळी ओलांडली आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी ४६ फूट एक इंचांवर आली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील ११० हून अधिक बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पंचगंगा नदीची इशारा पातळी ३९, तर धोका पातळी ४३ फूट आहे. दोन दिवसांपासून जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीची पाणीपातळी वेगाने वाढत आहे. कोल्हापूर जिल्ह्याला आज ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. कोल्हापुरात पावसाचा वेग कायम राहिल्यास पुन्हा एकदा हाहाःकार उडण्याची भीती आहे.
दुसरीकडे, सांगली जिल्ह्यात कृष्णा नदीच्या पाणी पातळीतही अचानकपणे वाढ झाल्याचं दिसत आहे. गुरुवारी रात्री ११ वाजता पाणीपातळी ३० फुटांवर गेली. सुर्यवंशी प्लॉटमध्ये पाणी शिरल्यामुळे १५ घरांमधील रहिवाशांचे तातडीने स्थलांतर करण्यात आले.
त्यामुळे नदीकाठच्या ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
नागरिकांनी सावधगिरी बाळगावी
कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी सावधगिरी बाळगावी आणि शासकीय यंत्रणांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे. जिल्ह्यात सर्वत्र अतिवृष्टी होत असल्याने डोंगराळ भागात भूस्खलन, दरडी कोसळणे, स्थानिक नाल्यांना तात्काळ पूर येणे अथवा गावठाणातील जुन्या घरांची पडझड अशा घटना शक्य असल्याने नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी केलंय.