यावल (प्रतिनिधी) शेतीच्या सातबारा उतार्यावरील तक्रारदाराच्या बहिणीचे नाव कमी करून देण्यासाठी पाच हजाराची लाच घेताना यावल तालुक्यातील मालोद येथील तलाठी कार्यालयातील कोतवालास एसीबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केल्याने खळबळ उडाली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात अधिक असे की, तक्रारदार यांची सावखेडासिम ता.यावल येथे शेत गट क्रं.२८१ मधील १ हेक्टर २१ आर ही शेतजमीन आहे. या शेतजमीनीचे ७/१२ उताऱ्यावरील इतर अधिकार नोंद मधील तक्रारदार यांची बहिण कमलबाई यांचे नाव मंडळ अधिकारी किनगाव यांचेकडून कमी करून देण्यासाठी यावल तालुक्यातील मालोद येथील तलाठी कार्यालयात कोतवाल पदावर कार्यरत असलेला कर्मचारी जहांगिर तडवी (रा. किनगाव ता. यावल जि.जळगाव) याने ५ हजाराची मागणी केली होती. त्यानुसार तक्रारदार याने लाचलुचपत विभागाला तक्रार दिली होती. विभागाने मंगळवार २२ फेब्रुवारी रोजी तालुक्यातील किनगाव मंडळाधिकारी कार्यालयाच्या बाजूला असलेल्या एका स्टेशनरी दुकानासमोर तक्रारदाराकडून ५ हजाराची लाच स्विकारतांना कोतवाल जहांगिर तडवी याला रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे किनगावसह तालुक्यात खळबळ उडाली आहे.
यांनी केली कारवाई
हि कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक, सुनील कडासने अप्पर पोलीस अधीक्षक, एन.एस.न्याहळदे, वाचक पोलीस उप अधीक्षक सतीश डी.भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली PI.श्री.संजोग बच्छाव, PI.एन.एन.जाधव, स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहीरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.मनोज जोशी, पो.ना.जनार्धन चौधरी, पो.कॉ.प्रविण पाटील, पो.कॉ.महेश सोमवंशी, पो.कॉ.नासिर देशमुख, पो.कॉ.प्रदिप पोळ यांनी केली.