जळगाव (प्रतिनिधी) खरीप हंगाम २०२१ यशस्वी करण्यासाठी व आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या रुंद वरंबा सरी तंत्रज्ञान, बीजप्रक्रिया, जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा संतुलित वापर, कापूस एक गाव एक वाण, आंतरपीक तंत्रज्ञान, विकेल ते पिकेल, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड व तंत्रज्ञान प्रसार, पिक उत्पादकता वाढीसाठी रिसोर्स बँकेतील शेतक-यांचा सहभाग, पिकांवरील किड व रोग नियंत्रण उपायोजना यासारख्या कृषि उत्पादन वाढीच्या दृष्टीने महत्त्वाच्या मोहिमांवर विशेष भर देऊन दि. २१ जून २०२१ ते १ जुलै २०२१ या कालावधीत कृषी संजीवनी मोहीम यशस्वीपणे पार पडली.
दि. १ जुलै २०२१ रोजी महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त साजरा केल्या जाणाऱ्या कृषी दिन कार्यक्रमाचे औचित्य साधून या कृषी संजीवनी मोहिमेचा सांगता कार्यक्रम सह्याद्री, राज्य अतिथी गृह, मुंबई येथे दु.१२.३० वाजता मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समारंभ पार पडला.
कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाशिक येथून थेट प्रक्षेपणाद्वारे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, कृषीमंत्री दादाजी भुसे, फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, कृषी राज्यमंत्री डॉ.विश्वजित कदम आणि फलोत्पादन राज्यमंत्री कु.आदिती तटकरे उपस्थित होते. या प्रसंगी राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे, प्रधान सचिव एकनाथ डवले, नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प संचालक विकास रस्तोगी हे देखील उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री यांच्या शुभहस्ते राज्यस्तरीय रब्बी हंगाम २०२०-२१ हंगामातील पीक स्पर्धेत गहू, हरभरा, रब्बी ज्वारी आणि करडई या पिकांमध्ये प्रथम क्रमांकाचे उच्चांकी उत्पादन घेतलेल्या सर्वसाधारण व आदिवासी गटातील विजेत्या शेतकऱ्यांचा प्रशस्तीपत्र, शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच राज्यस्तरीय पिकस्पर्धा विजेत्या शेतक-यांनी अंगिकारलेल्या तंत्रज्ञानाच्या पुस्तिकेचे आणि नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले.
सदर कार्यक्रमामध्ये कृषि संजीवनी मोहिम संकल्पना व अंमलबजावणी बाबत कृषीमंत्री दादाजी भुसे, यांनी सांगितले की, दरवर्षी कृषी दिनाचे औचित्य साधून दि. १ जुलैपासून ही मोहिम राबविली जाते. मात्र तोपर्यंत खरीप पिकांचा पेरणी आणि जमीन मशागतीचा कालावधी सुरु झालेला असतो. ही बाब लक्षात घेऊन यावर्षी १ जुलैपुर्वी ही मोहिम राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार २१ जून ते १ जुलै २०२१ कालावधीत कृषि विभागात राबविण्यात येणा-या विशेष मोहिमांवर भर देऊन संपूर्ण राज्यभर कृषी अधिकारी, शास्त्रज्ञ, कृषी मित्र यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कृषी संजीवनी मोहिमेच्या माध्यमातून खरीप हंगामाच्या दृष्टीने सर्व महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचविण्याचा कृषी विभागाने यशस्वी प्रयत्न केला.
दिनांक २१ जून २०२१ ते १ जुलै २०२१ या कालावधीत कृषी संजीवनी मोहिमेदरम्यान राज्यातील ३५४९७ गावांमध्ये प्रशिक्षणे/सभा/ प्रात्यक्षिके/वेबिनार /शेतीशाळा/ शिवार फेरी या प्रकारचे कार्यक्रम घेण्यात आले. त्यामध्ये ७,५२,२३० शेतकरी उपस्थित होते तसेच उपस्थित मार्गदर्शकांमध्ये ७३७ शास्त्रज्ञ, २७,६२० कृषी विभागाचे अधिकारी/ कर्मचारी, ११२०९ रिसोर्स बँकेतील शेतकरी आणि ५७,७६० प्रगतिशील शेतकरी तर ३५,४४६ लोकप्रतिनिधी/पदाधिकारी उपस्थित होते.
तद्नंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिक येथून थेट प्रक्षेपणाद्वारे तर कार्यक्रमामध्ये महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कृषि विभागामार्फत करत असलेल्या कामगिरीबाबत कृषि विभागाचे अभिनंदन करुन मार्गदर्शन केले. शेवटी कृषी राज्यमंत्री, डॉ.विश्वजित कदम यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाचा शेवट केला. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण कृषी विभागाचे यूट्यूब चैनल www.youtube.com/C/ AgricultureDepartmentGoM वरून करण्यात आल्याने राज्यातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत सदरचा कार्यक्रम पोहचला. असे अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.