नांदेड (वृत्तसंस्था) गोदावरी नदीवरील येळी-महाटी पुलावरून भरधाव कुझर जीप नदीपात्रात कोसळून झालेल्या अपघातात जीप चालक व त्याचा मित्राला जलसमाधी मिळाली हा अपघात शुक्रवारी ( ता. १०) रोजी सायंकाळी सहाच्या दरम्यान घडली आहे. उस्माननगर व मुदखेड पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने जीप व दोघांचे प्रेत बाहेर काढून पंचनामा करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
मुदखेडहुन येळी (ता. लोहा) कडे जात होती दरम्यान ही भरधाव क्रुझर जीप येळी महाटी पुलावर येताच गोदावरी पुलावर चालकाचे नियंत्रण सुटले व ही जीप थेट लोखंडी संरक्षक कठडे तोडत गोदावरी नदीपात्रात कोसळली. या दुर्दैवी अपघातात क्रुझर जीप चालक व मालक उद्धव आनंदराव खानसोळे (वय ३०.रा.शिखाची वाडी ता. मुदखेड) व त्यांचा मित्र थोराजी मारोती ढगे (वय २० रा. येळी ता. लोहा) हा अविवाहित तरुण या दोघांनाही जलसमाधी मिळाली व पाण्यात बुडून जीप मध्येच दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.
विशेष म्हणजे या ठिकाणी नदीपात्रात पाणी जास्त असल्याने शोध कार्यात अडथळा येत होता तरीदेखील उस्माननगर व मुदखेड पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने बोटीच्या सहाय्याने शोध मोहीम सुरू ठेवत मोठ्या परिश्रमाने अपघातग्रस्त जीप व दोघांचे प्रेत नदी बाहेर काढले.
पोलीसांनी पंचनामा करून करून उत्तरे तपासणीसाठी दोघांचे प्रेत मुदखेड येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या दुर्दैवी अपघातात ठार झालेले दोघेही जिवलग मित्र होते त्यामुळे आपल्या मित्राला येळी येथे सोडण्यासाठी उद्धव जीप घेऊन निघाले आणि नदीपात्रावर काळाने घाला घातला व दोघा जिवलग मित्रांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला.
विशेष म्हणजे थोराजी ढगे हा मयत मित्र अविवाहित असून त्याच्या ह्या अकाली अपघाती मृत्यूने येळी गावावर शोककळा पसरली आहे. या पुलावर बघ्यांनी एकच गर्दी केली होती. मुदखेड ठाण्याचे पोलीस निरीक्षक सप्रे व उस्माननगर ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पवार, गाडेकर आदींनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.