चोपडा (प्रतिनिधी) येथील शेतकी संघाची निवडणूक काही दिवसांपूर्वीच संपन्न झाली होती. दि.८ रोजी शेतकी संघाच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी अनुक्रमे ललित बागुल, सचिन धनगर यांचे एकमेव अर्ज आल्याने दोघांची बिनविरोध निवड करण्यात आली.
स्थापने पासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिपथ्याखाली असलेली ही संस्था शेतकरी वर्गासाठी महत्वाची असून,आज झालेल्या निवड प्रक्रियेत राजकीय गणित बघता अध्यक्षपदावर मराठा बहुजन समाजाचा उमेद्वार बसवणे क्रमप्राप्त होते. तेच समीकरण जपत राष्ट्रवादीने अध्यक्षपदावर वेळोदे येथील ललित सुभाष बागुल यांची तर उपाध्यक्ष पदासाठी धनगर समाजातील सचिन ईश्वर धनगर यांची निवड करण्यात आली आहे. सदरची निवड ही एक वर्षासाठी असणार आहे. निवडीचे सर्व अधिकार महाराष्ट्र राज्य विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांना देण्यात आले होते.
तरी गुरुवारी झालेल्या निवड प्रक्रिया बैठकीत माजी आ.कैलास पाटील, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष ऍड.संदीप पाटील, ऍड.घनश्याम पाटील, जिल्हा बँक संचालक घनश्याम अग्रवाल, चोसाका चेअरमन चंद्रहास गुजराथी,मार्केटचे माजी सभापती गिरीश पाटील,संचालक सुनील जैन, नंदकिशोर सांगोरे, सुरेश सीताराम पाटील, तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, प्रदीप पाटील, सूतगिरणी संचालक अमृत वाघ,नारायण पाटील,हितेंद्र देशमुख,विनोद पाटील,शशी पाटील,आदी हजर होते. निवड झाल्यानंतर विजयी उमेद्वारांनी अरुणभाई गुजराथी यांच्या निवासस्थानी जाऊन नेत्यांचे आशीर्वाद घेतले.
तालुकाध्यक्षांची नाराजी !
झालेल्या शेतकी संघाच्या निवडीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी आपली नाराजी असल्याचे कळवत, आपण आपल्या पदाचा राजीनामा देण्याच्या मानसिकतेत असल्याचे बोलून दाखवले.
आत्मपरीक्षण करावे नंतरच इतर लोकांना बोलावे !
पक्षासाठी कोणी योगदान दिले आहे हे या निवडीवरून काहींच्या लक्षात आलेच असेल पक्ष कोणी एक माणूस चालवू शकत नाही. त्यासाठी सर्वाचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यामुळे पक्षातील कोणत्याही माणसाने समजू नये की मी म्हणजे पक्ष होय. आपल्यावर किती लोक नाराज आहेत. हे आत्मपरीक्षण करावे नंतरच पक्षातील इतर लोकांना बोलावे, अशी प्रतिक्रिया शेतकी संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष ललीत बागुल यांनी दिली आहे.
















