सिन्नर (वृत्तसंस्था) येथील भूमी अभिलेख कार्यालयातील परिरक्षण भूमापक प्रतिभा दत्तात्रय करंजे (४२) यांना ५ हजार रुपयांची लाच घेताना लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे.
मनेगाव येथील तक्रारदाराने सिटी सर्वे क्रमांक १९७, १९८, १९९ प्लॉट पत्नीचे नावे खरेदी केले होते. त्यावरील जुन्या मालकाचे नाव कमी करून तक्रारदाराच्या पत्नीचे नाव लावायचे होते. त्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयाकडे ५ जुलै रोजी अर्ज केला होता. नवीन नावाची नोंदणी करण्यासाठी करंजे यांनी पाच हजार रुपयांची मागणी केली होती.
तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. त्यासाठी ठरल्याप्रमाणे कार्यालयातच सापळा रचण्यात आला. सापळा अधिकारी पोलिस उपनिरीक्षक विश्वजीत जाधव, सहायक सापळा अधिकारी परशुराम कांबळे, यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रकाश डोंगरे, संतोष गांगुर्डे, प्रणय इंगळे, शीतल सूर्यवंशी यानी ही कारवाई केल्याचे सांगण्यात आले आहे.