जळगाव (प्रतिनिधी) जळगाव येथील रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सचे संस्थापक, सुप्रसिद्ध व्यापारी, उद्योगपती, दानशूर व समाजसेवक स्व. रतनलाल सी. बाफना यांच्या स्मृतीस जळगावकरांतर्फे आदरांजलीसाठी ‘भावपुष्प’ या कार्यक्रमाचे आयोजन रविवार, दि. २२ नोव्हेंबरला करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम स्व. रतनलाल बाफना स्नेही परिवारतर्फे आयोजित आहे. सायंकाळी ६ वाजता संभाजीराजे नाट्य संकुलात वैयक्तिक स्वच्छता व सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत हा कार्यक्रम होईल. रतनलालजी बाफना यांनी व्यापार-उद्योग क्षेत्रासह सामाजिक उत्तरदायित्वाच्या पुढाकारातून केलेल्या वैविध्यपूर्ण कार्याविषयी संपूर्ण जळगावकरांकडून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या एकत्रित कार्यक्रमाचे आयोजन आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रक शहराच्या प्रथम नागरिक महापौर सौ. भारती कैलास सोनवणे, शहराचे आमदार सुरेश भोळे, जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, केशवस्मृती सेवा समुहाचे प्रकल्प प्रमुख भरत अमळकर व प्रा. डी. डी. बच्छाव आहेत. रतनलाल बाफना यांनी जळगाव शहरातीर सुमारे पाऊणे दशक केलेल्या वास्तव्यात एक उत्तम आणि विश्वासार्ह व्यावसायिक म्हणून नावलौकिक मिळवला. मात्र जळगाव शहरातील गरजू, दुर्बल घटकांना शक्य ती मदत करीत असताना अनेक सामाजिक उपक्रमात अपेक्षित ते योगदान दिले.
रतनलाल बाफना यांचा विविध क्षेत्रातील मान्यवरांसह तळागळातील लोकांशी प्रचंड संपर्क होता. अशा व्यक्तिमत्त्वाच्या संधार्भात जळगावकरांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘भावपुष्प’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास जळगावकरांनी उपस्थिती द्यावी, कोरोना महामारीचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन कार्यक्रमस्थळी योग्य सूचनांचे पालक करावे असे आवाहन निमंत्रकांनी केले आहे.