भुसावळ (प्रतिनिधी) तरुणांच्या मैदानी खेळाला प्रोत्साहित करण्यासाठी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर (डि. ए. ग्राउंड) अनिकेत व मित्र परिवार अफ्फान क्रिकेट क्लबच्यावतीने स्व. निखिल खडसे स्मृती चषक २०२२ चे आयोजन दि. ९ ते १३ फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले असल्याची माहिती प्रा. डॉ. सुनील नेवे यांनी दिली. येथील आंबेडकर मैदानावर आयोजित पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी नगराध्यक्ष रमण भोळे, अनिकेत पाटील, बापू महाजन, पुरुषोत्तम नारखेडे, देवा वाणी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
स्पर्धेचे उद्घाटन ९ रोजी सकाळी ९ वाजता मैदानावर माजी मंत्री एकनाथराव खडसे, खा. रक्षा खडसे, मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे, डिवायएसपी सोमनाथ वाघचौरे, पो.नि. राहुल गायकवाड, पो.नि. पडघन, पो.नि. विलास शेंडे यांच्यासह मान्यवरांची उपस्थितीत टॉस करुन उद्घाटन होणार आहे. प्रत्येक दिवशी ७ संघांत स्पर्धा होणार असून ६ ओव्हरची स्पर्धा असेल. चारही दिवसांतील विजेता संघांमध्ये सेमी फायनल व १३ रोजी सकाळी १० वाजता अंतिम सामना होणार आहे. दुपारी ३.३० वाजता बक्षीस वितरण भारतीय क्रिकेट संघाचे माजी कप्तान मोहम्मद अझरुद्दीन यांच्या हस्ते होणार आहे. स्पर्धेसाठी दोन जळगाव व तीन भुसावळचे पंच काम पहाणार आहे. ४ समालोचक असणार आहेत. ग्राउंड मॅन कमेटीत अर्षद, वसीम, इमरान यांच्यासह सहकार्यांची टीम असेल. प्रथम विजयी संघाला ५१ हजार रुपये व ट्रॉफी, द्वितीय ३१ हजार रुपये व ट्रॉफी, तृतिय २१ हजार व ट्रॉफी. बेस्ट टीम ११ हजार व ट्रॉफी, मॅन ऑफ द सिरीज २१०० रुपये, उत्कृष्ट फलंदाज १०००, उत्कृष्ठ गोलंदाज, हॅट्रीक खेळाडू ,तीन षटकार यांना प्रत्येकी १००० रुपये. बेस्ट कॅच, बेस्ट फिल्डर, विकेट किपर यांना प्रत्येकी ५०० रुपये बक्षीस असणार आहे.
स्पर्धेचे आयोजन केवळ निमित्त आहे. मात्र खेळाडू व युवकांसमोर आदर्श निर्माण व्हावा या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत ३२ संघ सहभागी होणार आहे. यात जिल्ह्यातील १७ संघ, भुसावळ शहर ६, तसेच अकोला, बुलढाणा, अमरावती, औरंगाबाद, मालेगाव, मुंबई, जळगाव (जामोद), खामगाव, पूणे यासह मध्य प्रदेशातील इंदौर येथील संघ सहभागी होणार आहेत. महिलांसाठी खास बैठक व्यवस्था करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. स्पर्धेच्या शिस्तबद्ध आयोजनासंदर्भात नियोजन सुरु असून ते अंतिम टप्प्यात आहे. या सामन्यांचे थेट प्रक्षेपण लिंकद्वारे व यु ट्यूब व शहरातील केबलवर करण्यात येणार आहे. डॉ. आंबेडकर मैदानाचे बकाल स्वरुप पालटून शहराच्या क्रिडा विश्वाच्य वैभवात भर पडणार आहे. मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांचे शहर विकासासाठी चांगले योगदान लाभत असल्याचे माजी नगराध्यक्ष रमण भोळे यांनी सांगितले.