कोल्हापूर (वृत्तसंस्था) गडहिंग्लज येथील अर्जुन उद्योग समूहाचे प्रमुख संतोष वसंत शिंदे, त्यांची पत्नी तेजस्विनी, मुलगा अर्जुन यांच्या आत्महत्याप्रकरणी संशयित आरोपी माजी नगरसेविकेसह पोलिस अधिकाऱ्याला कर्नाटकातील विजापूर येथून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर अन्य दोघांच्या शोधासाठी पुणे परिसरात पथके गेली आहेत.
मानसिक तणावातून आत्महत्या !
दोन महिन्यांपूर्वी संतोष शिंदे यांच्यावर लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी शिंदे यांना एक महिना तुरुंगवास सहन करावा लागला होता. तेव्हापासून ते मानसिक तणावाखाली होते. आपल्यावर खोटा गुन्हा दाखल झाल्यापासून ते तणावात होते. तसेच आर्थिक विवंचना आणि मानसिक ताणतणावाखाली त्यांनी शुक्रवारी (दि. २३) रात्री ११ ते शनिवार (दि. २४) पहाटे ५ या दरम्यान आपल्या पत्नी व मुलासह आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.
स्वहस्ताक्षरात आत्महत्येपूर्वी लिहिली चिठ्ठी !
आत्महत्या केलेल्या ठिकाणी शिंदे पती-पत्नीने स्वहस्ताक्षरात आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्या चिठ्ठीमध्ये संबंधित माजी नगरसेविका, तिचा साथीदार व पुणे येथील विशाल बाणेकर व संकेत पाटे यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे म्हटले होते. आत्महत्येपूर्वी संतोष आणि तेजस्विनी यांनी लिहून ठेवलेली चिठ्ठी आणि वहीतील मजकूर व फिर्यादीवरून ‘त्या’ नगरसेविकेसह संशयित पोलिस अधिकारी राहुल राऊत यांच्यासह विशाल बाणेकर व संतोष पाटे (रा. पुणे) या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शवविच्छेदन अहवालावरून पत्नी व मुलगा यांचा विष पाजून, गळा चिरून खून आणि त्यानंतर स्वतः विष प्राशन व गळा चिरून घेऊन आत्महत्या केल्याप्रकरणी मृत शिंदे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिकाऱ्यावर यवतमाळ व अन्यत्र एका ठिकाणी आधीही गुन्हा दाखल !
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस प्रशासनाने संशयितांच्या तपासासाठी तीन पथके रवाना केली होती. संबंधित नगरसेविकेचा साथीदार पोलीस खात्यात अधिकारी असल्याने हे प्रकरण अतिशय शिताफीने हाताळले. संबंधित संशयित पोलीस अधिकाऱ्यावर यवतमाळ व अन्यत्र एका ठिकाणी गुन्हा दाखल असून, तो पोलीस खात्यातून निलंबित होता. सध्या तो आजारी रजेवर होता. तपासाचा भाग म्हणून गडहिंग्लज पोलिसांनी त्याची दुचाकी ताब्यात घेतली आहे. घटना घडलेल्या दिवशी सकाळी ७.३० पासून ते दोघेही फरार होते. रविवारी (दि. २५) सायंकाळी त्या दोघांनाही विजापूर (कर्नाटक) येथून ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणातील अद्याप दोघे संशयित फरार आहेत. त्यांचा शोध सुरू आहे.
आरोपींचे वकीलपत्र कुणीही न घेण्याची विनंती !
बलात्काराचा खोटा गुन्हा आणि खंडणीची मागणी करून शिंदे, त्यांची पत्नी व मुलास आत्महत्येला प्रवृत्त करून, माणुसकीला काळिमा फासलेल्या आरोपींचे वकीलपत्र कुणीही घेऊ नये, असे आवाहन येथील सर्वपक्षीय कार्यकत्यांनी निवेदनाद्वारे गडहिंग्लज ॲडव्होकेट बार असोसिएशनचे अध्यक्ष सतीश तेली यांना केले आहे.