पाळधी, ता. धरणगाव (प्रतिनिधी) विघ्नहर्त्याच्या उत्सवात ईसीजी मशीनचे लोकार्पण करून जीपीएस मित्र मंडळाने एक महत पुण्याचे काम केले आहे, असे प्रतिपादन डॉ. सुशील गुजर यांनी केले.
येथील जीपीएस मित्र मंडळाने बसवलेल्या गणेश उत्सवाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. येथील जीपीएस मित्र मंडळाचे यंदा गणेश उत्सवाचे दुसरे वर्ष असून या वेळी त्यांनी प्रती पंढरपूरची आरास साकारली आहे. या मंडळाने गरजू रुग्णांसाठी ईसीजी मशीनचे लोकार्पण करण्याचे ठरविले होते. या मशीनद्वारे गरजू लोकांना कमीत कमी खर्चात १०० रूपयात ईसीजीची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. या मशीनचे लोकार्पण जिल्हा रुग्णालयाचे डॉ. किरण पाटील, डॉ. सुशील गुजर, डॉ. महेंद्र मल, डॉ. किरण पाटील व येथील स्थानिक डॉक्टर यांचा हस्ते करण्यात आले.
या वेळी डॉ. सुशील गुजर यांनी या उपक्रमाचे स्वागत करून मंडळाचे आभार व्यक्त केले. या उपक्रम अंतर्गत रुग्णांचे योग्य निदान करता येईल, असे सांगितले. श्रीराम ज्येष्ठ नागरिक संघाचे अजिज मण्यार यांनी हे मंडळ लोकोपयोगी कामात अग्रेसर असून त्यांनी आतापर्यंत केलेल्या कामांचा आढावा घेतला. मंडळाचे सर्वेसर्वा प्रतापराव पाटील यांनी मंडळात सर्वधर्मीय सभासद असून आम्ही कोणतेही निर्णय एकत्र बसून घेतो, असे सांगितले. या मशीनद्वारे गरजू रुग्णांची तपासणी करण्यात येईल. त्यातून त्यांना पुढील उपचाराची दिशा मिळेल, असेही ते म्हणाले.
या वेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील चव्हाण, डॉ. भूषण पाटील, डॉ. जयवंत पाटील, डॉ. प्रवीण झवर, डॉ. स्वप्नील पाटील, डॉ. पवन देपूरा, श्रीराम ज्येष्ठ नागरिक संघाचे अरुण सोनार, रमेश शिंदे, पत्रकार संघाचे विलास झवर, मुकुंदराव नन्नवरे, गोपाल सोनवणे, महेश मोरे, दीपक श्रीखंडे, भूषण महाजन आदी उपस्थित होते. कार्यक्रमानंतर सर्व मान्यवरांचा हस्ते आरती करण्यात आली. कार्यक्रमास जीपीएस मित्र मंडळाच्या सर्व सभासदांनी सहकार्य केले.