जळगाव (प्रतिनिधी) फेसबुक पाहत असताना गुंतवणूक करण्याविषयी जाहीरात दिली. त्यामुळे ती जाहीरात बघण्यासाठी लिंकवर क्लिक करताच ती ओपन झाली. त्यानंतर अॅड. विवेक चिंतामण पाटील (वय ४९, रा. भुसावळ) यांची २१ लाख ५२ हजार रुपयांचात फसवणुक झाली. ही घटना दि. १ ऑक्टोंबर ते दि. १४ नोव्हेंबर दरम्यान घडली. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुसावळ येथे अॅड. विवेक चिंतामण पाटील (वय ४९) हे वास्तव्यास आहे. दि. १ ऑक्टोबर रोजी फेसबुक पाहत असताना त्यांना गुंतवणुकीविषयी निर्मला सीताराम यांच्या नावाची जाहिरात दिसली. त्यामुळे त्यांनी त्यावर क्लिक केले असता एक टेलिग्राम खाते समोर आले. त्या वेळी लगेच अभय नामक व्यक्तीचा कॉल आला, त्या व्यक्तिने शेअर्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीविषयी माहिती दिली. कंपनीत जेवढी गोल्ड गुंतवणूक कराल त्याच्या दाम दुप्पट फायदा होईल, असे अॅड. पाटील यांना सांगितले. त्यानंतर त्यांचे नवीन टेलिग्राम खाते देखील उघडले.
अभासी पद्धतीने दाखवला नफा
वेळोवेळी पाठविलेल्या रकमेनंतर अॅड. पाटील यांना त्यांच्या प्रोफाईलवर एकूण ३१ लाख ६८ हजार रुपये नफा झाल्याचे दिसत होते. मात्र ती रक्कम अॅड. पाटील यांना काढता येत नव्हती. त्यांनी वरील दोघांशी संपर्क केला असता ती रक्कम ट्रेडमध्ये असून ती काढता येणार नसल्याचे सांगितले.
पैसे भरण्यासाठी खाते विकण्याची धमकी
तुमचा ट्रेड मायनसमध्ये गेला आहे, असे सांगून तुम्ही जर पैशाची मागणी केली तर तुमचे खाते दुसऱ्या व्यक्तीला विकून टाकू अशी अॅड. पाटील यांना धमकी देण्यात आली. ही रक्कम हवी असल्यास अजून गुंतवणूक करा, असे त्यांना सांगण्यात आले. मात्र पैसे संपल्याचे सांगूनही त्यांना भरलेली रक्कम परत मिळाली नाही.
फसवणुकीची खात्री झाल्यानंतर दिली तक्रार
शेअरच्या नावाने आपली फसवणुक झाल्याची खात्री झाल्यानंतर अॅड. पाटील यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अमन व नोमन नाव सांगणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सतीश गोराडे करीत आहेत.
गुंतवणुकीसाठी वेळोवेळी भरले २१ लाख
ट्रेलीग्रामवर आलेल्या मेसेजनुसार पाटील हे माहिती देत गेले. हे सर्व झाल्यानंतर कंपनीचा सिनीयर मॅनेजर नोमन याचा कॉल आला व त्याने १९ हजार १६३ रुपये भरण्यास सांगितले. त्यानुसार पाटील यांनी युपीआयद्वारे ती रक्कम जमा केली. ती रक्कम वेगवेगळ्या शेअर्समध्ये गुंतविल्याचे त्यांना दिसले. त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या कारणांनी रक्कम जमा करण्यास सांगितले व त्यानुसार अॅड. पाटील यांनी वेळोवेळी एकूण २१ लाख ५२ हजार ३६३ रुपये पाठविले
















