जळगाव (सुरेश उज्जैनवाल) स्वातंत्र्यानंतर सत्तरच्या दशकात राजकीय क्षेत्रात आलेल्या राजकारण्यांमध्ये माजी खासदार ईश्वरलाल जैन यांनी आपल्या व्यक्तिमत्वाच्या जोरावर स्वतःचा जो ठसा उमटविला, तो लौकिकार्थाने एक दुर्मिळ उदाहरण म्हणता येईल. बहुतांश कार्यकर्ते पद, प्रतिष्ठा मिळावी म्हणून राजकारणात येतात. परन्तु बाबूजी पद, प्रतिष्ठेपलीकडे जाऊन विचार करणारे व्यक्तीमत्व. पदापेक्षाही स्वतःचं व्यक्तिमत्व एवढं मोठं निर्माण केलं, की पदाला त्यांच्यामुळे प्रतिष्ठा मिळाली.. निर्मळ, स्वच्छ प्रतिमा, कणखरपणा अन् निस्वार्थ भाव अशा या चारित्र्यसम्पन्न, स्वयंप्रकाशित व्यक्तिमत्वाचा आज वाढदिवस, आपल्या वयाची 76 वर्षे पूर्ण करून 77 व्या वर्षात पदार्पण करीत असलेल्या बाबूजींचं त्यानिमित्त अभिष्टचिंतन…!
जिल्ह्यच्या राजकारणात जेव्हा माजी राष्ट्रपती सौ. प्रतिभाताई पाटील, बाळासाहेब मधुकरराव चौधरी, बापूसाहेब के. एम. पाटील, अनिलदादा देशमुख हे जिल्ह्यात अग्रणी नेते म्हणून असतानाच श्री बाबूजींनी आपली राजकीय फळी स्वकर्तृत्वावर निर्माण करीत स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलं. त्यासाठी राज्य अथवा राष्टीय नेत्यांचे उंबरठे त्यांंनी कधीच जिझवले नाहीत. त्यापेक्षा राष्ट्रीय पक्ष व नेतृत्वाचं लक्ष आपल्याकडे वेधण्यावर त्यांनी भर दिला. त्यामुळे सुरवातीच्या काळात थेट इंदिरा गांधींपर्यंत पोहचत आपलं महत्व निर्माण केलं, तर महाराष्ट्राच्या पातळीवर शरद पवार यांच्याशी व्यक्तिगत मैत्री द्वारे आपली योग्यता पवारांकडे प्रस्थापित केली. अशी किमया एका अल्पसंख्याक समाजाच्या व्यक्तीने स्वबळावर निर्माण करणे, हे देखील राजकीय क्षेत्रातील दुर्मिळ उदाहरण म्हणता येईल. आमदार, खासदार ते जिल्हा बँकेचे अध्यक्षपद स्वतःच्या हिमतीवर मिळवणाऱ्या बाबूजींनी राजकारणात तडजोड किंवा लाचारी कधीच पत्करली नाही. विचारांची स्पष्टता, प्रामाणिक वृत्ती आणि कणखरपणा ही वृत्ती आयुष्यभर जोपासली, ही बाब देखील राजकारणातील अफलातून अशीच म्हणता येईल. त्यांचा स्पष्टवक्तेपणा व निडरतेचं एक उदाहरण मुद्दाम येथे देत आहे. बहुधा सन 1978-79 ची ही घटना असावी, शरद पवार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी बाबूजींनी पुढाकार घेत तीस आमदारांचे एक शिष्ठमंडळ दिल्लीला इंदिरा गांधी यांच्याकडे ते घेऊन गेले, श्रीमती गांधी यांची भेट घेत पवारांना मुख्यमंत्री करण्याची विनंती केली असता, तुम्ही संजय गांधींना भेटलात का? असा प्रश्न इंदिरा गांधी यांनी केला असता श्री बाबूजी म्हणाले, आपण आमच्या अध्यक्षा आहात, तेव्हा केवळ तुम्हांकडेच मांगणी केली, अन्य व्यक्तीस भेटीचा विचारच येत नाही…
काँग्रेस ते राष्ट्रवादी काँग्रेस…
त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा प्रवास काँगेस ते राष्ट्रवादी असाच राहिला, पण या प्रवासात त्यांनी पदासाठी पक्ष नेतृत्वाकडे याचना केली नाही, की शिष्टमंडळे नेली नाहीत. उलट इतरांना स्वतःची प्रतिष्ठा खर्च करून उमेदवारी मिळवून दिली. त्यात प्रामुख्याने जामनेरचे बाबूसिंग राठोड, दत्तात्रय महाजन आदींचा उल्लेख करणे क्रमप्राप्त आहे. राष्ट्रवादी काँग्रेस स्थापनेत त्यांचाही महत्वाचा वाटा राहिला आहे. राज्यात जेव्हा काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीचं सरकार 1999 मध्ये अस्तिवात आलं, त्या वेळी शरद पवारांएवढंच त्यांच्या शब्दाला महत्व होतं.
नेत्यांशी मित्रत्व…
बाबूजींचा राजकीय मित्रपरिवारही समृद्धच म्हणावं लागेल. गुलाम नबी आझाद, हमीद अन्सारी, राजस्थांनचे मुख्यमंत्री अशोक गेलहोत, तसेच कै. अरूण जेटली यांचेशीही त्यांचे मैत्रीपूर्ण संबध होते. राज्यसभा सदस्य असताना त्यांनी अनेक महत्वाचे विषय संसदेत मांडले. त्यातील मुंबईचा मुद्दा लगेच मान्य केला गेला. बाबूजींनी राज्यसभेत बॉम्बेचं मुबंई केलं गेलंय रेल्वे, विमानतळ आदी सर्व ठिकानी बदल केले गेले, मात्र बॉम्बे हायकोर्टाचं मुंबई हायकोर्ट का होत नाही, असा प्रश्न केला असता तो तत्काळ मंजूर झाला…
पत्रकार म्हणून मी बाबूजींना 1988 पासून जवळून बघितले आहे. एक निर्मळ व्यक्तिमत्व पण त्याच बरोबर धाडसी वृत्ती, आर्थिक श्रीमती असली तरी, मनाच्या मोठेपणाचीही श्रीमंती मी अनुभवली.. राजकारणाच्या दिर्घ प्रवासात या व्यक्तीने कधीही सवंग लोकप्रियतेसाठी प्रयत्न केला नाही, की कधी कुणाचं वाईट ही चिंतले नाही. ते आता सक्रिय राजकारणात नाहीत आशा या स्वयंप्रकाशित व्यक्तिमत्वास या निमित्ताने पुढील वाटचालीस शुभेच्छा…
सुरेश उज्जैनवाल,
ज्येष्ठ पत्रकार, जळगाव
८८८८८८९०१४