पिंपरी (वृत्तसंस्था) राज्याचे प्रश्न कोमात, स्वबळाची छमछम जोरात, असे राज्याच्या परिस्थितीचे वर्णन करता येईल. महाविकास आघाडीतील नेते उठसूट स्व:बळाची भाषा करत आहेत. प्रश्नांची सोडवणूक करण्याऐवजी प्रत्येक नेता स्वबळाचा मंत्र जपतात, अशी टीका भाजपचे नेते आमदार आशिष शेलार यांनी केली. पिंपरीमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
आशिष शेलार म्हणाले की, “राज्यातील शेतकऱ्यांना बोगस बियाने दिली. कर्जमुक्ती, पीकविमा, वादळामुळे झालेले नुकसान भरपाई, महिला अत्याचार, सायबर क्राईम याकडे दुर्लक्ष केले जात आहे. सरकार पोलिसांकडून वसूलीचे काम करत आहे. बारा बलूतेदार, अलुतेदार यांना मदत दिली नाही. पोलीस दल आपापसातील गँगवारमध्ये विखुरलेले दिसत आहे. ज्या केसेस समोर येत आहेत त्यात माजी गृहमंत्री फरार दिसत आहेत. ओबीसींच राजकीय आरक्षण हे सरकार टिकवू शकलं नाही. मराठा आरक्षण जे फडणवीस सरकारने दिलं होतं ते यांच्या नाकर्तेपणामुळे गेलं. तसेच, अशा अनेक समस्यांमुळे राज्यातील जनता कोमात आहे. तर, जोमात केवळ स्व:बळाची छमछम आहे.” असा टोला आशिष शेलार यांनी यावेळी लगावला.
याचबरोबर शेलार म्हणाले की, महाविकास आघाडीतील नेते उठसूट स्व:बळाची भाषा करत आहेत, जप जपतात….आम्हाला याच्याशी घेणेदेणे नाही. शिवसेनेतील नेत्याच्या पायाखालची वाळू घसरायला लागल्याने नंतर बेताल वक्तव्य करत आहेत. राज्याचं आजच्या स्थितीच वर्णन करायचं झाल्यास राज्याचे प्रश्न कोमात आणि स्व;बळाची छमछम जोरात, अशा पद्धतीचे चित्र आहे. अस देखील शेलार यांनी म्हटलं आहे.