मुंबई (वृत्तसंस्था) मधल्या काळात ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, जयसिंगराव गायकवाड आणि आज राजीव आवळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. जे कुणी भाजपचा राजीनामा देऊन महाविकास आघाडीत येतील त्यांच्या विरोधात भाजप साहजिकच उमेदवार देईल. पण आम्ही तीनही पक्ष मिळून त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करु”, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील जनसुराज्य पक्षाचे नेते, माजी आमदार राजीव आवळे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी बोलताना अजित पवार यांनी भाजपमधील आमदारांना राष्ट्रवादीत येण्याचे आवाहन केले. पवार पुढे म्हणाले की, ‘विविध पक्षातील नेते राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत. मागील वेळेस विरोधकांकडून अनेक प्रलोभने, आमिषे दाखवून आमच्या पक्षातील नेत्यांना त्यांच्या पक्षात नेण्यात आले. काही लोकांना भीती दाखवून फोडण्याचा प्रयत्न झाला. आघाडीचे सरकार येणार नाही, असे समजून अनेक नेते तिकडे गेले होते. पण आता त्यांनाही आपण आघाडी सोडून का गेलो? असे वाटायला लागलं आहे,’ असे पवार म्हणाले. “जे कुणी भाजपचा राजीनामा देऊन महाविकास आघाडीत येतील त्यांच्या विरोधात भाजप साहजिकच उमेदवार देईल. पण आम्ही तीनही पक्ष मिळून त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करु, असं सांगतानाच येत्या काळात अनेक नेते राष्ट्रवादीत प्रवेश करतील”, असंही अजित पवार यांनी सांगितलं. “कोरोना संकटात महाविकास आघाडीने चोख काम करुन दाखवले. देश आणि राज्याची अर्थव्यवस्था अडचणीत असताना देखील आम्ही त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शरद पवारसाहेब, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आशीर्वाद सोबत असेपर्यंत या महाविकास आघाडी सरकारला कोणताही धक्का लागणार नाही”, असा विश्वास अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केला.