जामनेर (प्रतिनिधी) साखरपुड्यानंतर लग्नासाठी आलेल्या नवरदेवासह वऱ्हाडींची चांगली व्यवस्था व मानसन्मान न दिल्याचा आरोप करत जामनेरात मंगळवारी होऊ घातलेला विवाह सोहळा अर्ध्यावर सोडून नाराज नवरदेवाने वऱ्हाडींसह पलायन केले. परंतू नवरदेव व त्यांच्या नातेवाइकांना मुलीकडच्या लोकांनी बोदवडजवळ अडविले आणि थेट जामनेर पोलिसात आणले. याठिकाणी तब्बल १३ तासांच्या मध्यस्थीनंतर वधूपक्षाचा खर्च भरून देण्यावर तडजोड झाली.
भुसावळ तालुक्यातील कुन्हा येथील मूळ रहिवासी व हल्ली जयपूर येथील उच्चशिक्षित वधूचे मोताळा तालुक्यातील पोफळी येथील मूळ रहिवासी व हल्ली इंदोर येथे राहणाऱ्या तरुणाशी विवाह ठरला. दोघांचेही बहुतांशी नातेवाईक हे जामनेर तालुक्यातील आहेत. त्याचबरोबर मुलीच्या मामाचे गावही जामनेरच असल्याने सर्वांच्या सोयीसाठी म्हणून हा विवाह सोहळा जामनेर येथे करण्याचे ठरले. जामनेर येथे सोमवारी साखरपुडा व हळदीचा कार्यक्रम असल्याने खासगी बसमधून सकाळीच वर पक्षाकडील मंडळी गावात पोहोचली. याचवेळी वधूच्या मामाकडील नातेवाइकांमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे काहिशी तारांबळून उडाली.
यामुळे गैरसोय झाल्याचे आरोप करत नवरदेव रागाने निघून गेला. नवरदेवाचे वाहन थेट मध्य प्रदेशाच्या हद्दीत पोहोचले होते. त्याच पाठोपाठ वऱ्हाडी मंडळींची लक्झरी गाडीही बोदवडपर्यंत पोहोचली होती. या प्रकाराची चर्चा होताच नातेवाईकांनी बोदवड येथे वऱ्हाडींची लक्झरी अडवली. या ठिकाणी चर्चा करत असताना वर पक्षाकडून गैरसोय झाल्याचे आरोप करत १५ लाखांची मागणी केली. यामुळे संतप्त झालेल्या वधूच्या काही नातेवाईकांनी वराकडील काहिंना चोप दिला. तसेच नवरदेवाची संपर्क साधत त्यासही बोदवड येथे येण्यास भाग पाडले. त्यानंतर सर्वांना मुलीकडच्यांनी जामनेर पोलिस ठाण्यात आणले. बोदवड येथून दोन्ही गाड्या जामनेर पोलिसांत आणल्या. तेथे दोन्ही पक्षात तबब्ल १३ तास मध्यस्थी करून वधूपक्षाचा खर्च भरून देण्यावर झाली तडजोड झाली. दरम्यान, अवघ्या प्री-वेडिंग फोटोशूट करण्यासाठी जयपूरमध्ये तब्बल सव्वा लाखांचा खर्च झाला होता.