पुणे (वृत्तसंस्था) विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेना नेते, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या समर्थक आमदारांसह बंडखोरी केली आहे. हेच सुरु असताना राज्यात दुसरीकडे पंढरपूर पालखी मार्गावर फलक उभारत भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पांडुरंगाला साकडे घातले आहे. ‘मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी येऊ दे !’ असे फलक लावण्यात आले.
पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीच्या सोहळ्यात विठ्ठलाची पूजा करण्याचा मान राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आहे. मुख्यमंत्री सपत्निक विठ्ठलाची पूजा करतात. राजकीय परिस्थितीत भारतीय जनता पक्षाला सत्ता स्थापन करण्याची संधी मिळेल, अशी चर्चा आहे. महाराष्ट्रात लवकरात लवकर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेत यावे यासाठीच हालचाली विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निकालानंतर सुरू झाल्या आहेत.शिवसेनेतील नाराजी उफाळून आल्याने सर्व पार्श्वभूमीवर भाजपकडून या संधीचे सोने करण्याची तयारी सुरू आहे.
भारतीय जनता पक्षाच्या शिवाजीनगर मतदारसंघातील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, ‘हे माऊली तुझा कृपा आशीर्वाद सदैव राहू दे, तुझ्या पंढरपूरच्या पूजेला मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी येऊ दे !’ असा मजकूर या फलकावर असून देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पत्नी अमृता यांचे विठ्ठलाची पूजा करतानाचे छायाचित्र फलकावर दिसत आहे.शिवाजीनगर मतदारसंघातील भाजप पदाधिकारी प्रकाश सोळंकी आणि रविंद्र साळेगांवकर यांनी हा फलक उभारला आहे.
















