धरणगाव (प्रतिनिधी) पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केवळ आपले मंत्रिपद जाऊ नये म्हणून शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. या गद्दारांना शिवसैनिकांची निष्ठा काय असते हे येणाऱ्या काळात दाखवल्याशिवाय राहणार नाहीत. तसेच गुलाबराव पाटील यांच्या पाळधी या गावात येणाऱ्या काळात लवकरच शिवसेनेना नेते संजय राऊत यांची सभा घेऊन गुलाबराव पाटील यांना ‘सळो की पळो’, केल्याशिवाय राहणार नाहीत, असे शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी जाहीर सभेत केले.
धरणगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात करारा जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्ह्याचे संपर्कप्रमुख संजय सावंत, सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, जिल्हा अध्यक्ष विष्णू भंगाळे, माजी जि प सदस्य जानकीराम पाटील, जळगाव महानगरचे प्रमुख सुनील महाजन, शरद तायडे माजी जि.प. सदस्य रमेश पाटील आदी मान्यवर होते. दोन दिवसापूर्वी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी धरणगाव येथील एका कार्यक्रमात गुलाबराव वाघ, सुरेश चौधरी यांच्यावर टीका करून संपवण्याचे भाषा केले होते. यावर उत्तर म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाकडून करारा सभेचे आयोजन करण्यात आले होते.
धरणगाव शहरासह जळगाव ग्रामीण मतदार संघातील ५०० विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला. जळगाव तालुक्यातील कानळदा व भोकर येथील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपाचे कार्यकर्त्यांचा समावेश होता. यात सह संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांनी पालकमंत्र्यांवर टीका करत म्हणाले की, ५० खोके घेऊन पालकमंत्री हे नकली वाघ आहेत. परंतु मी ३७ वर्ष पर्यंत कुठल्याही पदाची अपेक्षा न करता शिवसैनिक म्हणून काम करीत आहे. ज्या सुरेश चौधरींमुळे पालकमंत्री चार वेळा आमदार झालेत. दोन वेळा मंत्री झालेत आणि त्याच सुरेश चौधरींना संपवायची भाषा करीत आहेत. आम्ही एकनिष्ठ आहोत तुमच्यासारखे स्वार्थासाठी आम्ही गद्दारी केलेली नाही, अशी टीका केली.
जाहीर सभेत लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की. माझ्या वडिलांनी गुलाबराव पाटलांना पंचवीस वर्षे साथ दिली. एवढेच नाही आमदार होण्यासाठी मंत्री होण्यासाठी आर्थिक रसद पुरवली. त्यांनी सहकार्य केले नसते तर ते आज इथपर्यंत पोहोचलेच नसते. आणि अशा व्यक्तीला संपवण्याची भाषा करत आहात. ज्या गुलाबराव वाघा यांनी तुम्हाला ३७ वर्षापासून साथ दिली आणि त्याच वाघांना तुम्ही संपवण्याचे भाषा करत आहात. निश्चितच तुम्हाला पदाचा व पैशाचा गर्व झाला आहे आणि तो येणाऱ्या काळात गर्वहरण केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाहीत.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर माजी जि.प. सदस्य रमेश पाटील, माजी जि.प. उपाध्यक्ष जानकीराम पाटील, विष्णू भंगाळे यांनीही घणाघाती टीका केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माजी नगरसेवक भागवत चौधरी, सुरेश महाजन, संतोष सोनवणे, राजेंद्र ठाकरे, धीरेंद्र पूरभे, दीपक सोनवणे, अरविंद चौधरी, विलास पवार, राहुल रोकडे, लक्ष्मण माळी, जयेश महाजनसह शिवसैनिकांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अॅड. शरद माळी यांनी केले.