भुसावळ (प्रतिनिधी) भुसावळ नगरपरिषद, भुसावळ हद्दीतील घनकचरा व्यवस्थापन कामाचे निविदामध्ये मुख्याधिकारी यांच्या गैरव्यवहारांची चौकशी होऊन निविदा रद्द करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवक दुर्गेश नारायण ठाकूर यांनी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे एका निवेदनाद्वारे केली होती. त्यावर राज्याचे अवर सचिव यांनी भुसावळ मुख्य अधिकाऱ्यांची चौकशी करून स्वयंस्पष्ट अहवाल सादर करण्याचे पत्र जळगाव जिल्हाधिकारी यांना नुकतेच पाठवले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवक दुर्गेश नारायण ठाकूर यांनी आपल्या तक्रारीत म्हटले होते की, भुसावळ नगरपरिषदेमध्ये घनकचरा व्यवस्थापन कामाची निविदा काढण्यात आली होती. सदर निविदा प्रसिध्द करण्याआधी मा. जिल्हा अधिकारी सो. यांच्या मान्यतेनेचा म्हणजेच “टेक्निकल मान्यता” नंतर सदर निविदा काढण्यात यावी असा कायदेशीर नियम असताना देखील सदर निविदा ही बाबींकडे जाणुनबुजून दुर्लक्ष करुन निविदा काढण्यात आलेली होती. वास्तविक सदर निविदा ही कायदेशीर व योग्य अटी शर्तीनुसार काढण्यात आली पाहिजे होती परंतु सदर निविदेमध्ये जाणुन बुजून PRADEEP HANUMANT JADHAV (GSTN-NA) या कंपनीस सदर निविदा भरण्यास मदत होईल व त्याच कंपनीला घनकचरा व्यवस्थापनाचे काम मिळेल. याअनुषंगाने सदर निविदा काढण्यात आली होती असे दिसून येत आहे. कारण प्रथम निविदा स्विकारण्याच्या अंतिम तारखेपर्यंत एकच निविदा भरण्यात आली होती. त्यामुळे कोणतीही अट शर्ती न बदलता पुन्हा त्याच प्रकारची फेर निविदा नगरपरिषदेकडून काढण्यात आली. त्यावेळी एकही निविदा कोणत्याही कंत्राटदाराकडून भरण्यात आलेली नव्हती.
त्यामुळे सदर कामाच्या अनुषंगाने कोणत्याही बदला विना पुन्हा फेर निविदा काढण्यात आली. त्यामुळे PRADEEP HANUMANT JADHAV (GSTN-NA) या कंपनीस हे काम मिळावे यासाठी नगरपरिषदेने काढलेली निविदेसाठी सदर कंपनीने PRADEEP HANUMANT JADHAV (GSTN-NA) व एक दुसऱ्या कंपनीने म्हणजेच समीक्षा वेस्ट मॅनेजमेंट प्रा. लि. कंपनी तर्फे निविदा भरण्यात आल्या होत्या. सदर निविदा सर्वात कमी दराची म्हणून समीक्षा वेस्ट मॅनेजमेंट प्रा. लि. या कंपनीला मिळाले. सदर कंपनीचे मासिक दर रु. ६२,००,०००/- असे होते. परंतु मा. जिल्हाधिकारी यांनी निविदेतील अटी व शर्तीमध्ये बदल व कामाची व्याप्ती कमी करुन मंजुरी दिल्यामुळे सदर मक्तेदारांनी काम करण्यास नकार दिला. निविदा प्रसिध्द करण्यात आली. सदर निविदा प्रसिध्द करताना मे. समीक्षा वेस्ट मॅनेजमेंट प्रा. लि. या कंपनीस निविदा भरता येऊ नये म्हणून मे. समिक्षाकडे बायोमायनिंग कामाचा अनुभव नसल्याचे सदर फेर निविदेमध्येही अट टाकण्यात आल्यामुळे मे समिक्षा कंपनीस निविदा भरता येणार नाही याची काळजी घेतल्याचे दिसून येते. PRADEEP HANUMANT JADHAV (GSTN-NA) या कंपनीला सदर कंत्राट मिळावे यासाठी सुमारे २ वर्षे बायोमायनिंगचा अनुभव असलेली कंपनी असावी अशी अट घालण्यात आली.
भुसावळ नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि त्यांचे इतर अधिकारी यांनी सर्वांनी मिळून PRADEEP HANUMANT JADHAV (GSTN-NA) या कंपनीला निविदा मिळण्यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत. मागील वर्षी सुध्दा समिक्षा वेस्ट मॅनेजमेंट प्रा. लि. कंपनीने अर्ज केला होता परंतु त्याच कंपनीला पुन्हा काम मिळू नये म्हणून कोणत्या नविन अटी शर्ती घातल्यास समिक्षा वेस्ट मॅनेजमेंट प्रा. लि. कंपनी या कंपनीला व इतर कंपनीला काम नाही याची पडताळणी करुनच अशा अटी लावण्यात आल्या आहेत. PRADEEP HANUMANT JADHAV (GSTN – NA) हया कंपनीकडे कोणते कागदपत्र इतर कंपनीपेक्षा जास्त आहेत व इतर कंपनीपेक्षा वेगळे काय आहे हे पाहून PRADEEP HANUMANT JADHAV (GSTN – NA) कंपनीला कंत्राट मिळेल याच उद्देशाने नवीन अटी शर्ती घालण्यात आले आहे व यापूर्वी देखील घातल्या आहेत. PRADEEP HANUMANT JADHAV (GSTN-NA) कंपनीचे आणि भुसावळ नगर परिषदेचे मुख्याधिकारी व इतर अधिकारी यांचा सदर कंपनीसोबत नक्की काय संबंध आहेत आणि त्यांचा वैयक्तिक काय सहभाग आहे याची पडताळणी करणे आवश्यक आहे. सध्या PRADEEP HANUMANT JADHAV (GSTN-NA) या कंपनीचे त्यांचे दरपत्र मासिक दर रु ९५,००,०००/- रुपये दिलेले आहे आणि यापुर्वीच टेंडरमध्ये समिक्षा वेस्ट मॅनेजमेंट प्रा. लि. कंपनी यांनी मासिक दर ६२,००,०००/- रुपये दिलेले दरपत्रात सुध्दा ६,००,०००/- रुपये कंपनीला कोणतीही माहिती न देता परस्पर कमी केले होते. म्हणजेच सुमारे २ महिन्यापूर्वी भुसावळ नगरपरिषदेस ६२,००,०००/- रुपये खुप महाग वाटत होते आणि २ महिन्यानंतर लगेच ९५,००,०००/- रुपयांमध्ये PRADEEP HANUMANT JADHAV (GSTN-NA) या कंपनीचा दर कमी वाटून त्यांना सदर घनकचरा व्यवस्थापन कंत्राट देण्यात आले.
यामध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे की, भुसावळ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आणि इतर संबंधीत अधिकारी यांचा PRADEEP HANUMANT JADHAV (GSTN-NA) या कंपनीच्या व्यवहारामध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार झालेला दिसून येत आहे. तसेच त्यांचे सदर कंपनीसोबत वैयक्तिक व्यवहार सुध्दा असल्याचे नाकारता येऊ शकत नाही. सदर कंपनीची आणि संबंधीत अधिकाऱ्यांची तसेच घनकचरा निविदांची संपूर्ण पडताळणी होणे आणि सत्य काय आहे हे समोर येणे तसेच भुसावळ नगर परिषदेचे पैसे वाचविणे गरजेच आहे व सदरची निविदा प्रक्रिया पारदर्शकपणे होणे गरजेचे आहे. म्हणून सदरची निविदा रद्द करून फेरनिविदा काढताना जास्तीत जास्त मक्तेदारांना भाग घेता येईल अशा अटी व शर्ती टाकून निविदा काढल्यास नगरपालिकेचे होणारे आर्थिक नुकसान होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी मुख्याधिकारी संदिप चिद्रवार यांच्या गैरव्यवहाराची चौकशी व सदरची निविदा रद्द करणे अशी विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली होती.
या अनुषंगाने नगर विकास विभागाचे राज्याचे अवर सचिव प्रतिभा पाटील यांनी 2 डिसेंबर रोजी जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून मुख्यधिकाऱ्यांच्या तक्रारी संदर्भात चौकशी करून स्वयंस्पष्ट अहवाल 12 डिसेंबर पर्यन्त पाठविण्याच्या सूचना केल्या आहेत.