जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात खरीप हंगाम सुरू होताच कृत्रिम टंचाई आणि साठेबाजीमुळे जादा किमती खतांची विक्रीसह लिंकिंग घटना वाढल्या आहेत. खतांचा भरपूर साठा असूनही शेतकऱ्यांना मुद्दाम नकार देणाऱ्या, तसेच विनापरवाना गोदामात अनधिकृत साठवणूक करणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील ५ कृषी केंद्र चालकांविरोधात कारवाई करत कृषी विभागाने बुधवारी दि. ९ रोजी त्यांचे परवाने निलंबित केले आहेत.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्वान तडवी व जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक विकास बोरसे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केलेल्या तपासणीत ७ कृषी केंद्रांत गैरप्रकारासह अनियमितता आढळून आली आहे. निलंबित झालेल्या परवानाधारकांमध्ये चोपडा तालुक्यातील २, चाळीसगाव, बोiदवड व भुसावळच्या प्रत्येकी एका कृषी केंद्रचालकाचा समावेश आहे.
जळगाव शहरातील एका नर्सरीची तपासणी या पथकाने केली. या नर्सरीतील औषधांसह बियाण्यांच्या साठ्यावरही संशय आहे. त्यामुळे या नर्सरी परवानाधारकाविरोधात सुनावणी सुरु आहे. सुनावणीला परवानाधारक अनुपस्थित राहिल्याने पुढच्या आठवड्यात सुनावणी होणार आहे. तसेच चोपड्यातील एकाने विनापरवाना खत व बियाण्यांची विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तीन प्रकरणात सुनावणी सुरु
जिल्ह्यात प्राप्त तक्रारीनुसार कृषी केंद्रांची तपासणी नियमितपणे सुरु आहे. दोषी आढळलेल्या कृषी केंद्रचालकांचे परवाने निलंबित केले जात आहे. आणखी तीन प्रकरणात सुनावणी सुरु आहे. सुनावणीनंतर कारवाईचा निर्णय घेतला जाईल.
विकास बोरसे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक