धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील उड्डाण पुलाजवळ मोठा खड्डा निर्माण झाला असून, त्यात भरपूर प्रमाणात पाणी साचले आहे. या खड्ड्यामुळे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच, अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.
विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात असल्याने पालक आणि नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अनेक वेळा वाहनचालकांना हा खड्डा दिसत नसल्याने ते तिथे अडकतात किंवा अपघातग्रस्त होतात. या पार्श्वभूमीवर संबंधित प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिक करत आहेत.
“जर या ठिकाणी मोठा अपघात झाला तर जबाबदार कोण?” असा सवाल संतप्त नागरिक विचारत आहेत. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि तातडीने खड्डे बुजवावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे.