जळगाव (प्रतिनिधी) मुख्यमंत्री अर्थ सहाय्य योजनेअंतर्गत महिलांना पिंक ऑटो घेण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका पत्राद्वारे केली.
ॲड. जमील देशपांडे यांनी पत्रात म्हंटले आहे की, महाराष्ट्र राज्यात अनेक महिला स्वतःच्या कर्तृत्वाने रिक्षा चालवून आपली उपजीविका करत आहेत. काही महिला स्वतः रिक्षा चालक-मालक म्हणून सक्षमपणे कार्यरत आहेत. मात्र, दुर्दैवाने राष्ट्रीयकृत बँकांकडून महिलांना प्रवासी वाहतूक रिक्षा घेण्यासाठी कर्ज मिळण्यास मोठ्या अडचणी येतात आणि खूप वेळ लागत असल्याचे दिसून येते.
पिंक ऑटो ही संकल्पना जळगाव जिल्ह्यात सामाजिक संघटनेच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षांपासून राबवली जात असून, सध्या वीस महिला रिक्षा चालवत आहेत. शासनाचे कोणतेही अनुदान या महिलांनी घेतलेले नाही. मात्र, आणखी काही महिला रिक्षा चालवून उदरनिर्वाह करण्याची इच्छा बाळगतात. तथापि, शासकीय अनुदान नसल्यामुळे या महिलांना जास्त आर्थिक भार उचलणे शक्य नाही.
मुख्यमंत्री अर्थ सहाय्य योजनेअंतर्गत इतर व्यावसायिक कारणांसाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येते, मात्र महिलांना प्रवासी वाहतूक रिक्षा घेण्यासाठी योजनेत समावेश नसल्यामुळे अनेक इच्छुक महिला व्यवसाय सुरू करू शकत नाहीत. त्यामुळे, महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री अर्थ सहाय्य योजनेअंतर्गत पिंक ऑटो किंवा प्रवासी वाहतूक रिक्षा घेण्यासाठी कर्ज मंजूर करण्याबाबत त्वरित आदेश देण्यात यावेत, अशी आमची विनंती आहे. तरी आपण यासंदर्भात तातडीने निर्णय घेऊन राष्ट्रीयकृत बँकांना आवश्यक त्या सूचनादेखील द्याव्यात, जेणेकरून महिलांना सहजपणे कर्ज मिळू शकेल आणि त्या स्वावलंबी होऊ शकतील, असे ॲड. जमील देशपांडे यांनी म्हंटले आहे.