जळगाव (प्रतिनिधी) कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी ३१ जानेवारी २०२१ पर्यंत वाढविण्यात आला आहे. या कालावधीत कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी राज्य शासनाकडून वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश, निर्देश, नियमावलीनुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश लागू राहतील, असे जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी कळविले आहे.
जिल्हाधिकारी राऊत यांनी म्हटले आहे, सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय मुंबई यांच्या १४ मार्च, २०२० रोजीच्या आदेशान्वये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा १३ मार्च २०२० पासून लागू आहे. त्यातील तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी अधिसूचना निर्गमित केली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी हे त्यांच्या कार्यक्षेत्रात कोरोना विषाणूवर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाय योजना करणे आवश्यक आहे त्यासाठी सक्षम प्राधिकारी आहेत. जिल्ह्यात २२ डिसेंबर २०२० च्या आदेशान्वये जळगाव शहर महानगरपालिका क्षेत्रात ५ जानेवारी २०२१ पर्यंत रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत, तर जळगाव महानगरपालिका, सर्व नगरपालिका, सर्व नगरपरिषद क्षेत्रात ३१ डिसेंबर २०२० रोजी रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत पूर्णत: संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. त्यानंतर राज्य शासनाने लॉकडाऊनचा कालावधी ३१ जानेवारी २०२१ पर्यंत वाढविला आहे. त्यानुसार जळगाव जिल्ह्याकरीता लॉकडाऊनचा कालावधी ३१ जानेवारी २०२१ पर्यंत वाढविण्यात आला आहे.
कोरोना विषाणूच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याबाबत राज्य शासनाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले आदेश, निर्देश, नियमावलीनुसार या कार्यालयाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले आदेश लागू राहतील. या आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहिता, १८६० (४५) चे कलम १८८, आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम ५१ ते ६० तरतुदीनुसार शिक्षेस संबंधित पात्र राहील, असेही जिल्हाधिकारी राऊत यांनी म्हटले आहे.