नागपूर (वृत्तसंस्था) प्रेयसी दोन महिन्यांची गर्भवती असतानाच प्रियकराचे तिच्याच मैत्रिणीशी सूत जुळले. हा प्रकार उघडकीस येताच प्रेयसीने प्रियकराविरुद्ध बलात्काराची तक्रार दिली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून युवकाला अटक केली. ही घटना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. गुलशन उर्फ गोल्डी धनराम हरीणखेडे (२०, रा. एमआयडीसी, नागपूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पीडित १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी बारावीची विद्यार्थिनी आहे. तिची १० महिन्यांपूर्वी गुलशनशी इन्स्टाग्रामवरून ओळख झाली. गुलशन हा नळ दुरुस्तीची कामे करतो. दोघांमध्ये मोबाइलवर बोलणे सुरू झाले. आरोपी गुलशनने तिला आमिषे दाखवून प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर त्याने तिला एका ठिकाणी बोलाविले. तिला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. आरोपीने ३० ऑक्टोबर २०२२ ते २६ जुलै २०२३ या दरम्यान सलग आठ महिने अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केले.
दरम्यान, आरोपी गुलशनशी तिच्या मैत्रिणीशी ओळख झाली. ती एका खासगी कंपनीत नोकरी करते.
गुलशन पहिली प्रेयसी आणि तिची मैत्रीण या दोघींवरही प्रेम असल्याचे भासवू लागला. दरम्यान, दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले. तर दुसरीकडे पहिल्या प्रेयसीला ती दोन महिन्यांची गर्भवती असल्याचे लक्षात येताच ती चांगलीच तणावात आली. तिने लग्नासाठी गुलशनकडे तगादा लावला. याचदरम्यान तिला गुलशन तिच्याच मैत्रिणीच्या प्रेमात पडल्याचे कळले. तिने गुलशनला मैत्रिणीसोबत असलेल्या प्रेमसंबंधाबाबत विचारणा केली. त्याने तिच्यावर प्रेम असल्याची कबुली दिली. त्यामुळे चिडलेल्या पहिल्या प्रेयसीने पोलीस ठाणे गाठून गुलशनविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी गुलशनविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटल केली आहे.