फैजपूर (प्रतिनिधी) एका तरुणाने पंजाबी ड्रेस परिधान करून प्रेयसीच्या 60 वर्षीय आजीच्या डोळ्यात स्प्रे मारुन अपहरणाचा बनाव रचला. यानंतर अवघ्या 24 तासांत लग्न करून प्रेमी युगुल पोलिस ठाण्यात हजर देखील झाले. यामुळे जियेगा मरेगा, मरेगा करेगा भरेगा, भरेगा सूली चढ़ेगा…लव के लिए साला कुछ भी करेगा…या गीत वजा चित्रपटाची शहरात जोरदार चर्चा सुरु आहे.
आजीच्या डोळ्यावर मारला स्प्रे !
या संदर्भात अधिक असे की, 17 ऑक्टोबर रोजी सकाळी सात वाजता 60 वर्षीय वृद्धा आपल्या 22 वर्षीय नातीसह मंदिरात जाण्यासाठी निघाली होती. यावेळी बस स्थानकाजवळील प्रांत कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मुलीच्या वेशात, पंजाबी ड्रेस परिधान केलेला एक तरुण चारचाकीने येऊन त्यांच्यासमोर उभा राहिला. या मुलाने एक स्प्रे आजीच्या डोळ्यावर मारला. यामुळे आजीला डोळ्यात जळजळ झाली. ही संधी साधुन त्याने तरुणीला गाडीत धक्का मारुन बसवले. यानंतर चारचाकीने पलायन केले. ही घटना घडल्यानंतर आजीने तात्काळ पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली.
लग्न करण्यासाठीच आम्हाला पळून जायचे होते !
पोलिसांनी सांगीतल्यानुसार गुन्हा दाखल करुन घेतला. सकाळी भररस्त्यावर घडलेल्या या घटनेबाबत पोलिसांना देखील संशय होता. त्यांनी आजीसह मुलीच्या पालकांची विचारपुस केली. परंतु, सर्वांनी अपहरण झाले आहे. अगदी मुलीचे कोणाशीही प्रेमसंबध नव्हते असेच उत्तरे दिली. यामुळे पोलिसांनी तपासचक्रे फिरवण्यास सुरूवात केली. पोलिसांचा तपास सुरू असतानाच मंगळवारी दुपारी संबधित तरुणी व तीला पळवून नेणारा तरुण हे दोघे लग्न करुन पोलिस ठाण्यात हजर झाले. लग्न करण्यासाठीच आम्हाला पळून जायचे होते, यासाठी अपहरण केल्याचा जबाब दोघांनीही पोलिसांना दिला.
प्रेमात आणि युद्धात सर्व काही क्षम्य असतं !
प्रेमात आणि युद्धात सर्व काही क्षम्य असतं, असं म्हणतात. परंतू लग्न करण्यासाठी कुणी मुलीचा वेश परिधान करून तिच्या आजीच्या डोळ्यात स्प्रे मारुन अपहरणाचा बनाव रचल्याची कहाणी जरा वेगळीच आहे. काहींना प्रेम मिळवायला जी कसरत करावी लागते भयाण थ्रील असतं. फैजपूरमधील ही घटना असचं काहीसं थ्रील दर्शवते. परंतू प्रेमात आणि युद्धात सर्व काही क्षम्य असतं, ही झाली प्रेमाची भाषा…फैजपूर पोलिसांना मात्र, दाखल तक्रारीनुसार पळवून नेणे आणि तरुणाने प्रेयसीच्या आजीच्या डोळ्यात स्प्रे मारला होता की नाही? याचा तपास करावाच लागणार आहे.