अमळनेर (प्रतिनिधी) एचएएल या मोठ्या कंपनीत ओळख असल्याचे सांगून तुमच्या मुलाला लावून देतो असे सांगून देशमुख नगरातील एका वृद्धाकडून 5 लाख 40 हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी शनिवारी 10 ऑगस्ट रोजी रात्री 10 वाजता 3 जणांविरोधात अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
मनोहर धोंडू पाटील (वय- 62 रा. देशमुख नगर अमळनेर) हे वृद्ध आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. जुलै 2021 मध्ये मनोहर पाटील यांची सुनील विश्वासराव पाटील रा. नंदुरबार व इतर दोघांशी ओळख निर्माण झाली. त्यावेळी सुनील पाटील याने एचएएल कंपनीतील लोकांसोबत आपली ओळख असल्याचे सांगून तुमच्या मुलाला नोकरीला लावून देतो असे मनोहर पाटील यांना सांगून 5 लाख 40 हजार रुपये घेतले. व त्यांना बनावट कागदपत्रे पाठवून त्यांची फसवणूक केली आहे. दरम्यान कंपनीत न लावल्यामुळे वृद्धाने पैसे मागितले, परंतु त्यांना पैसे मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी अखेर शनिवारी 10 ऑगस्ट रोजी रात्री 10 वाजता अमळनेर पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात सुनील विश्वासराव पाटील, निखिल सुनील पाटील आणि सुमनबाई विश्वासराव पाटील तिघे रा. नंदुरबार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर हे करीत आहे.
















