पिंपरी (वृत्तसंस्था) एका तरुणाने पिंपरी जवळील देहूरोड येथील घोराडेश्वर डोंगरावर आपल्या वहिणीसोबत फिरायला गेल्यानंतर, तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपी तरुणाने पीडित महिलेचा गळा आवळून हत्या केल्यानंतर तिचं डोकं दगडानं ठेचलं.
हत्या झालेल्या २५ वर्षीय महिला देहूरोड येथील थॉमस कॉलनीत वास्तव्याला होत्या. तर तुकाराम कोंडीबा धडस असं अटक केलेल्या २४ वर्षीय आरोपी चुलत दीराचं नाव आहे. मृत महिला रविवारी पहाटे आपल्या चुलत दीरासोबत घोराडेश्वर डोंगरावर फिरायला गेल्या होत्या. दरम्यान नराधम चुलत दीराने वहिनीकडे शरीरसुखाची मागणी केली. पण पीडित महिलेनं शारीरिक संबंधासाठी नकार दिला. वहिनीने लैंगिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने चिडलेल्या आरोपी चुलत दीराने पीडितेची थेट गळा आवळून हत्या केली. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने पीडितेची ओळख पटू नये, म्हणून तिचं दगडाने डोकं ठेचलं आहे. यानंतर आरोपीनं पीडितेचा मृतदेह एका झुडुपात टाकून घटनास्थळावरून पळ काढला आहे. सोमवारी सकाळी काही स्थानिक नागरिकांनी हा मृतदेह पाहिल्यानंतर ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आणि मृत महिलेची ओळख पटवून पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपी दीराला ताब्यात घेतलं आहे. या घटनेचा पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस करत आहेत.