भुसावळ (प्रतिनिधी) महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाच्या योजनेत कोट्यावधींच्या अपहार प्रकरणा जळगाव आर्थिक गुन्हे शाखेने आज शहरातून एकाला अटक केली आहे. विनोद निकम असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. या वृत्ताला अर्थिक गुन्हे शाखेचे डीवायएसपी डेरे यांनी दुजोरा दिला आहे.
म. फुले मागासवर्ग विकास महामंडळाकडून अर्थसहाय्य घेताना बोगस लाभार्थी दाखवून महामंडळ व बँकेच्या अधिकाऱ्यांनी साडेतीन कोटी रुपयांचा अपहार केला होता. शेकडो बोगस लाभार्थी दाखविण्यात आले होते. यात महामंडळ व बँकांचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह एजंट आदींचा समावेश होता. २०१६ ते २०१८ या कालावधीत हा अपहार झाला होता. याप्रकरणी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या अधिकाऱ्याने तक्रार दिल्यानंतर रामानंद आणि जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. यात बँकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दलालांना हाताशी धरुन एकाचा फोटो दुसऱ्याच्या आधार कार्डवर, पत्ता तिसऱ्याचाच अशा प्रकारची शेकडो बोगस प्रकरणे तयार करून बीज भांडवल योजनेंतर्गत कोट्यावधी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप आहे.
या गुन्ह्यात २०१८ पासून फरारी असलेला विनोद निकम यांच्यावर ओव्हर ड्राफ्टच्या आधारे कोट्यांवधी रुपये लाटल्याचा आरोप आहे. निकम आज भुसावळ बाजार पेठ पोलिसात एक तक्रार देण्यासाठी आला होता. त्याचवेळी पोलिसांच्या लक्षात आले की, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाच्या योजनेच्या घोटाळ्यात फरारी आरोपी आहे. भुसावळ पोलिसांनी तात्काळ जळगाव आर्थिक गुन्हे शाखेसोबत संपर्क साधत निकम संदर्भात माहिती दिली. यानंतर जळगाव आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने भुसावळ गाठत निकमला ताब्यात घेतले.