जळगांव दि. 15 : विद्युत वितरण क्षेत्रात ग्राहक समाधान महत्त्वाचे आहे. त्यासाठी महावितरण कटीबध्द आहे. अधिकाधिक चांगल्या ग्राहकसेवा देण्यासाठी वापरलेल्या विजेच्या देयकांची देय तारखांच्या आतच नियमितपणे वसुली होणे आवश्यक आहे. त्यासाठी नियोजनबध्द पध्दतीने काम करण्याचे आवाहन महावितरणच्या कोकण (कल्याण) परिक्षेत्राचे सहव्यवस्थापकीय संचालक श्री दिलीप जगदाळे यांनी केले.
कोकण परिक्षेत्राचे सहव्यवस्थापकीय संचालक श्री जगदाळे जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. बुधवार दिनांक 15 जानेवारी रोजी सुरु झालेल्या दौऱ्यात त्यांनी महावितरणच्या जळगाव मंडलातील सातही विभागांचा उपविभागीय आढावा घेतला. परिमंडल कार्यालयातील सभागृहात झालेल्या आढावा बैठकीस परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री आय.ए.मुलाणी, परिक्षेत्राचे वित्त व लेखा विभागाचे महाव्यवस्थापक श्री अनिल बराटे, जळगावचे अधीक्षक अभियंता श्री अनिल महाजन, जळगाव परिमंडलाचे पायाभूत सुविधा विभागाचे अधिक्षक अभियंता श्री मनोज विश्वासे, सहाय्यक महाव्यवस्थापक श्री अशोक केदारे यांच्यासह सर्व कार्यकारी अभियंते, अतिरिक्त कार्यकारी अभियंते व उपकार्यकारी अभियंते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बुधवारी बैठकीच्या प्रारंभी सहव्यवस्थापकीय संचालक श्री दिलीप जगदाळे यांनी अचानकपणे जळगाव शहरालगतच्या पाळधी गावात जाऊन तेथील उपकेंद्रातील गावठाण आणि कृषी वाहिन्यांच्या विलगीकरण कामाची पाहाणी केली. तेथे त्यांनी सुरक्षा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भाने काही सुचनाही केल्या. जळगाव ग्रामीण उपविभागातील वडाळी गावाशेजारील शेतीतल्या सौरकृषी पंपाचीही पाहाणी केली. काही ठिकाणी त्यांनी प्रधानमंत्री सुर्यघर योजनेतील घराच्या छतावरील सौरप्रकल्पाचीही पाहणी केली.
बैठकीत बोलताना सहव्यवस्थापकीय संचालकांनी अभय योजनेत कायम खंडित झालेल्या ग्राहकांना द्ये देय सवलतीच्या माध्यमातून पुन्हा नव्याने प्रवाहात आणण्याचे आवाहन करताना त्यांनी एखादी जमीन किंवा घराच्या जागेचे, आस्थापनेच्या जागेचे खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून हस्तांतरण झालेले असलेतरी त्या जागेवरील विजेच्या थकबाकीचा बोझा सद्यस्थितीतील ताबेदार मालकावर पडलेला असेल, हा कायदेशीर विषय अधोरेखित केला. अर्थात, प्रॉपर्टीच्या हस्तांतरणाने विजेची थकबाकी कुणालाही बुडविता येत नसल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात नागरिकांकडून विजेचा अधिकृतपणेच वापर होणे आवश्यक आहे. अनाधिकृत वीज वापरातून होणारे अपघात टाळता येतील. सोबतच अचुक बिलींगसाठीही त्याचा उपयोग होईल. वीजचोरीच्या प्रकरणात आवश्यक तिथे पोलीसांत गुन्हे दाखल करण्याच्याही सुचना सहव्यवस्थापकीय संचालक श्री जगदाळे यांनी दिल्या. ग्राहकांना विहित कालावधीत, सहज आणि शक्य तितक्या सोप्या पध्दतीने तत्काळ नवीन वीज जोडण्या देण्याचेही आवाहन यावेळी करण्यात आले.
चांगली ग्राहकसेवा देण्यासाठी महावितरणला पुरेशा महसुलाची आवश्यकता आहे. त्यासाठी विजेच्या चालू महिन्यांच्या देयकांसह थकबाकी पूर्ण क्षमतेने आणि सातत्याने वसुल होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. बैठकीच्या प्रारंभी सहव्यवस्थापकीय संचालकांचे मुख्य अभियंता श्री आय.ए.मुलाणी व अधीक्षक अभियंता श्री अनिल महाजन यांनी स्वागत केले.
कॅप्शनः- पाळधी येथील वीज उपकेंद्रात वाहिनी विलगीकरणाची पाहणी करताना सहव्यवस्थापकीय संचालक श्री दिलीप जगदाळे, आय.ए.मुलाणी, अनिल महाजन व इतरजण छायाचित्रात दिसत आहेत.
प्रति,
मा.संपादक / प्रतिनिधी
कृपया उपरोक्त प्रसिध्दी पत्रकास आपल्या वृत्तपत्रातून प्रसिध्दी द्यावी ही विनंती.
जनसंपर्क अधिकारी
परिमंडल कार्यालय, जळगांव