औरंगाबाद (वृत्तसंस्था) पदवीधर निवडणुकीत भाजपला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर आता महाविकास आघाडी सरकारला ‘एकीचे बळ’ लक्षात आलेले दिसत आहे. कारण भाजपला रोखण्यासाठी राज्यातील आगामी ग्रामपंचायत निवडणुकाही एकत्र लढण्याची तयारी महाविकास आघाडीकडून सुरु करण्यात आली आहे.
गावागावात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे पदवीधर निवडणुकीचंच चित्र ग्रामपंचायत निवडणुकीत पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. औरंगाबाद जिल्ह्याचा विचार केला तर ६१८ ग्रांमपंतायतींमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना महाविकास आघाडीच्या रुपाने एकत्र लढणार आहे. तशी माहिती महाविकास आघाडीच्या गोटातून देण्यात आली आहे. त्यामुळे आगामी ग्रांमपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असं चित्र पाहायला मिळालं तर अनेक गावातील राजकीय समिकरणे बदलणार हे निश्चित मानलं जात आहे. विधानपरिषद निवडणुकीत महा विकास आघाडीला चांगले यश मिळाल्यानंतर आता १५ जानेवारीला होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीनंतर राज्यातील शंभर नगरपालिका आणि पाच महापालिकांची निवडणूक फेब्रुवारीमध्ये होण्याची दाट शक्यता आहे. भाजपच्या विरोधात तीन पक्ष एकत्र आले तर चांगले यश मिळू शकते याचा अंदाज तिन्ही पक्षांच्या नेत्यांना आला असून सध्याची परिस्थिती महाविकासआघाडी साठी अनुकूल असल्याने महापालिका, नगरपालिकांची निवडणूक लवकरात लवकर घेण्याचा सरकारचा प्रयत्न असेल असे मानले जाते. पाच महापालिकांमध्ये औरंगाबाद, कोल्हापूर, नवी मुंबई, वसई- विरार, आणि कल्याण-डोंबिवलीचा समावेश आहे. राष्ट्रवादीच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, पाचही महापालिकांचा कार्यकाळ आधीच संपला आहे. जवळपास १०० नगरपालिका/नगरपंचायत इंचाचा एक तर कार्यकाळ संपला आहे किंवा संपत आहे. सर्व निवडणुका एकत्रितपणे लढण्याची की हा विकास आघाडीची भूमिका आहे व ती कायम राहील. १५ जानेवारीला १४ हजार २३२ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. त्यातील सरपंचपदाची आरक्षण सोडत ही निवडणुकीनंतर करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे.